Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

निगरगट्ट सरकारला सात दिवसांचा ‘अल्टिमेटम’; अन्यथा मंत्रालय ताब्यात घेणार!

– सात दिवसांत मागण्या मान्य करा; अन्यथा २९ नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेऊ – तुपकर
– बुलढाण्यात सोयाबीन – कापूस उत्पादकांचा रेकॉर्डब्रेक महामोर्चा, तुपकरांच्या नेतृत्वावर जिल्ह्याचे शिक्कामोर्तब!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आपल्या न्याय हक्कांच्या मागण्यासाठी शेतकरी, शेतमजुरांचे वादळ आज (दि.२०) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात धडकले. सोयाबीन – कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा हा एल्गार महामोर्चा रेकॉर्डब्रेक ठरला. यापूर्वी अशा प्रकारचा अति अतिविराट महामोर्चा बुलढाणेकरांनी कधीही पाहिला नव्हता. या महामोर्चातून जिल्हावासीयांनी तुपकरांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात तुपकरांच्या विरोधात कुणीही उभा राहिला तरी त्याला धूळ चारली जाणे निश्चित झाले आहे. दरम्यान, शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर तुपकरांनी तुफान हल्ला चढविला. ते म्हणाले, ही लढाई केवळ शेतकर्‍यांच्या मागण्यांची लढाई नसून, गावगाड्यातील सर्व सामान्य नागरिकांच्या हक्काची लढाई आहे. राजवाडाविरुद्ध गावगाडा अशी ही आरपारची लढाई असून, या लढाईत जीव गेला तरी मागे हटणार नाही. शेतकर्‍यांसाठी शहीद होण्याची ही माझी तयारी आहे, अशी ग्वाही तुपकरांनी देत, शेतकरीहितांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला त्यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला. जर सरकारने २७ नोव्हेंबरपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर २८ नोव्हेंबरला राज्यभरातील हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने आगेकूच करतील व २९ नोव्हेंबरला मंत्रालयात घुसून मंत्रालयाचा ताबा घेतील, असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या विराट महामोर्चातून दिला आहे.

सोयाबीन – कापसाला दरवाढ मिळावी तसेच येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी व शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात एल्गार रथयात्रा सुरू होती. या एल्गार रथयात्रेचा समारोप सोमवारी जिल्हा मुख्यालय बुलढाणा येथे महामोर्चाने करण्यात आला. गावगाड्यातील शेतकरी, शेतमजूर, तरुण महिला या मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी झाल्याने आजवरच्या निघालेल्या सर्व मोर्चाचे रेकॉर्ड या मोर्चाने मोडीत काढले. किन्होळा येथे मुक्कामी असलेली रविकांत तुकारांची रथयात्रा पहाटे बुलढाणाकडे मार्गस्थ झाली, दुपारी बारा वाजता यात्रा बुलढाण्यात पोहोचताच यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. या सोबतच पहाटेपासून जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून शेतकर्‍यांनी खचाखच भरलेली वाहने बुलढाण्यात दाखल होत होती. दुपारी एक वाजता जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल परिसरातून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात या महामोर्चाला सुरुवात झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक, मुख्य बाजार लाईन, कारंजा चौक यामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर विराट सभेत झाले. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून व स्व. राणा चंदन यांना अभिवादन करून या सभेची सुरुवात झाली. राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी तसेच कर्नाटक राज्यातून आलेले पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी रविकांत तुपकरांनी सरकारवर तुफान हल्ला चढविला. ते म्हणाले, की आपण ज्यांना खासदार आमदार म्हणून निवडून देतो त्यांनी सभागृहात सोयाबीन कापसाचा प्रश्न मांडला पाहिजे. परंतु, दुर्देवाने सोयाबीन कापसावर कुणीच बोलत नसल्याने, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे आता आपल्या हक्काची लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. गावगाड्यातील शेतकर्‍यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे. मागच्या वर्षी देखील मोर्चा काढला. त्यानंतर थेट मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन व त्यानंतर आत्मदहन आंदोलन केल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई, पीकविमा व मदत असे तब्बल ५१७ कोटी रुपये मिळाले, हे आंदोलनाचे यश आहे. तर त्याच्या मागील वर्षी अन्नत्याग आंदोलन व नंतर दिल्लीतील पाठपुरावा यामुळे सोयाबीनला आठ तर कापसाला दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. आताची परिस्थिती बिकट आहे. सोयाबीनचा एकरी खर्च ३६ हजार तर मिळणारे उत्पादन १८ हजार आहे. कापसाचा क्विंटलचा खर्च ८ हजार आणि मिळणारा भाव साडेसहा हजार आहे. ही तफावत पाहता सोयाबीनला किमान ९ हजार स्थीर भाव मिळावा व कापसाला १२ हजार स्थीर भाव मिळावा, अशी आपली मागणी आहे. रविकांत तुपकरांकडे पैसा नाही, संपत्ती नाही असे काही जण म्हणतात. परंतु मोर्चात विराट संख्येने उपस्थित असलेले हे शेतकरी, शेतमजूर आपली खरी संपत्ती असून, त्यांच्या बळावरच आपण ही लढाई लढणार आहे. गेल्यावर्षी सरकारने सोयाबीन-कापसाच्या भावाबाबत फसवणूक केली. परंतु यावर्षी सरकारची फसवणूक करायची ाfहम्मत होणार नाही. त्यासाठी आरपारची लढाई लढायची आहे, अशी ग्वाही देत शेतकर्‍यांसाठी शहीद होण्याचीही आपली तयारी आहे, असे तुपकरांनी सांगितले. आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला आठ दिवसांचा वेळ आम्ही देत आहोत. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २८ नोव्हेंबररोजी सकाळी ९ वाजता हजारो शेतकर्‍यांना सोबत घेऊन मुंबईकडे रवाना होणार व २९ नोव्हेंबररोजी मुंबईत मंत्रलावयावर धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेऊ, असा गंभीर इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. यासाठी सर्व शेतकर्‍यांनी तयार व्हावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.


या आहेत प्रमुख मागण्या…

येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रूपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ९ हजार व कापसाला किमान १२,५०० रूपये भाव मिळावा, चालू वर्षाची पीकविम्याची अग्रिम व १०० टक्के पीकविमा भरपाई मिळावी, विनाअट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात महापुराने झालेल्या नुकसानीची १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी शेतीला सौरऊर्जेचे नाही तर तारेचे/सिमेंटचे मजबूत कंपाऊंड मिळावे, सोयापेंडीची आयात थांबवून निर्यात करावी, खाद्यतेलावरील आयात शुल्क ३० टक्के करावा, कापूस व सुत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, तेलबियांवरील जीएसटी रद्द करावा, जीएम सोयाबीन व कापसाला भारतात लागवडीची परवानगी मिळावी, तरुणांना हक्काचा रोजगार मिळावा, शेतीला पूर्णवेळ मोफत वीज द्यावी, शेतमजूरांना विमा सुरक्षा व मदत द्यावी, महिला बचत गटांना कर्जमाफी द्यावी, भूमीहिनांना शेतजमिनीचे कायम पट्टे द्यावे, दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, मेंढपाळांना चराई क्षेत्र मिळावे, मागील वर्षीच्या त्रुटीतील शेतकर्‍यांना व अल्प पीकविमा मिळालेल्या शेतकर्‍यांना पीकविम्याची १०० टक्के रक्कम द्यावी, वारकरी बांधवांसाठी शासनस्तरावर वारकरी महामंडळाची स्थापना करावी, कृषी कर्जासाठी सी-बीलची अट रद्द करावी, अनुदानाच्या पैशाला बँकांनी लावलेले होल्ड काढावे, शेतरस्ते व पांदण रस्ते प्राधान्याने तात्काळ मिळावे, आदी मागण्या यावेळी रविकांत तुपकर यांनी मांडल्या.


कर्नाटकसह महाराष्ट्रातून पदाधिकार्‍यांची उपस्थिती

या महामोर्चात जिल्हाच्या कानाकोपर्‍यातील गाव-खेड्यांमधून शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण सहभागी झाले होते. तसेच कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, यवतमाळ, अमरावती अशा राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच कर्नाटक येथील रयत शेतकरी संघाचे पदाधिकारीदेखील सहभागी झाले होते. रविकांत तुपकर हे राज्याचे नेतृत्व असून, हे आंदोलन राज्यव्यापी ठरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यभरातील शेतकरी आणि कार्यकर्ते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात या लढाईत सहभागी होतील, अशी ग्वाही या प्रमुख पदाधिकार्‍यांनी सभेत बोलताना दिली.
————-

https://breakingmaharashtra.in/elgar_morcha_live/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!