बुलढाणा (बाळू वानखेडे) – अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित समूहांना काँग्रेस पक्षाकड़ून मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने राज्यस्तरावर विशेष कृतीदल समिती गठीत करण्यात आली आहे. सदर कृतीदल समितीच्या अध्यक्षपदी बुलढाण्याचे विजय अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कृतीदल समितीयादी
सर्व जातीसमूहांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचा काँग्रेस पक्षाचा नेहमीच प्रयत्न असतो. परंतु काही जातीतील समूह अजूनही पक्षाच्या विचारधारेशी जुळलेले नाहीत, हे सत्य नाकारून चालणार नाही. म्हणूनच अशा अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित जाती समूहातील लोकांना काँग्रेसने मुख्य प्रवाहात आणण्याचे ठरविले असून, पक्षाची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यस्तरावर विशेष कृतीदल समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती प्रमुखपदी बुलढाणा येथील काँग्रेस नेते विजय अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंभोरे यांचे संघटनकौशल्य चांगले असून, १९९४ मध्ये भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक म्हणून बुलढाणा येथे रूजू झाल्यानंतर त्यांनी नेहरू युवा मंड़ळाच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उभे केले. त्याचदरम्यान खा. मुकूल वासनिक हे केंद्रात तत्कालीन क्रीडा व युवक कल्याण मंत्री असताना त्यांनी युवकांसाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम जिल्ह्यात राबवले होते. या दरम्यान तत्कालीन केद्रीय मंत्री तथा अभिनेते स्व.सुनील दत्त व तत्कालीन केंदीय मंत्री खा.मुकूल वासनिक यांच्या जिल्ह्यातून गेलेल्या मानवता यात्रेचे यशस्वी नियोजन विजय अंभोरे यांनी केले होते. नोकरीतून राजीनामा दिल्यानंतर काहीकाळ जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर खा. मुकूल वासनिक यांनी त्यांच्यावर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. तीही त्यांनी यशस्वीरित्या पार पाड़ली. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेसह बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस पक्षाचा झेंड़ा फडकला होता, हे विशेष.
यादरम्यान त्यांनी राबविलेला बीएलओ पॅटर्न प्रदेश काँग्रेसने नंतर राज्यभर राबवला. तद्नंतर त्यांची प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. येथेही त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाड़ली. सध्या ते प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदावर काम करीत असून, त्यांचा कामाचा अनुभव व काम करण्याची आगळीवेगळी पध्दत पाहता, प्रदेश काँग्रेसकडून त्यांची विशेष कृतीदल राज्य समिती प्रमुखपदी ७ नोव्हेंबररोजी नियुक्ती करण्यात आली आहे. समिती सचिवपदी प्रा.संजय वानखेडे यवतमाळ तर सदस्यपदी श्रीमती प्रतिमा उके मुंबई, राजाराम बल्लाळ पुणे, रावसाहेब नाड़े छत्रपती संभाजीनगर, सुरेश मारू नाशिक, अविनाश भालेराव जळगाव, प्रा.शहाजी परसे सोलापूर, महेश कांबळे ठाणे, पराग कांबळे अकोला, सागर कलाने अमरावती, विनोद जोगदंड़ वाशिम, श्रीमती अश्विनी खोब्रागड़े चंद्रपूर व रविकांत गजधने जालना यांचा समावेश आहे.