मराठा आरक्षणावरून मंत्रिमंडळ बैठकीत ताणाताणी!
– भुजबळ, देसाई यांच्या शाब्दिक वाद?
– मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास भुजबळांचा कडाडून विरोध, सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – मराठा आरक्षणावरून राज्य मंत्रिमंडळात दुफळी असल्याची बाब चव्हाट्यावर आली असून, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांच्यात उभा संघर्ष पेटला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतदेखील यावरून दोन मंत्र्यांत ताणाताणी झाली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्यांना बाहेर जायाला सांगून, दोन्हीही मंत्र्यांना संयमाचा सल्ला दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या मुद्द्यावरून सरकारमध्ये मतभेद आहेत, असा मेसेज जायाला नको, अशी भूमिका मांडली असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे.
अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या धोरणांवरच आक्षेप घेत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखे आहे, अशी संतप्त भूमिका मांडल्याची माहिती खात्रीशीर सूत्राने दिली. भुजबळांच्या या भूमिकेला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. तर, ओबीसीतून नको अशी मागणी छगन भुजबळांनी केली. एका बाजूने कुणबी प्रमाणपत्र देत काही लोकांना घ्यायचे आणि दुसरीकडे ओबीसींविरोधात न्यायालयीन लढाईद्वारे बाहेर ढकलायचे, असा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरु असल्याचा आरोप भुजबळांनी यावेळी केल्याचे सूत्राने सांगितले. मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळे आरक्षण द्या, ओबीसीतून नको. दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत तणाव निर्माण झाल्याचे सूत्राने सांगितले.
त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अधिकार्यांना बाहेर जाण्यास सांगून सरकारमधील मंत्र्यांनी एकमेकांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली. जर अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधात वक्तव्य केली जात असतील तर सरकारमध्ये दुही असल्याचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे मंत्र्यांनी भूमिका मांडताना संयमाने भूमिका मांडावी, असे आवाहन फडणवीसांनी केले. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनीही दुजोरा देत, हा प्रश्न संयमाने घेण्याचा सल्ला संबंधित मंत्र्यांना दिला, असेही या खात्रीशीर सूत्राने सांगितले. दरम्यान, या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी ट्वीट करून बेकायदेशीरपणे अठरापगड जातीचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप करून ओबीसी समाज हे कदापि सहन करणार नसल्याचा इशारा आपल्याच सरकारला दिला आहे.
—————-