एक रूपयांत पीकविम्याची कमाल, ऐनदिवाळीत जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार १८.३९ कोटी रूपये
– राज्यातील ३५ लाख शेतकर्यांना मिळणार १७०० कोटींची अग्रीम पीक नुकसान भरपाई
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यातील शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्या पीकविमा कंपन्यांना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर ताळ्यावर आणले असून, पहिल्या टप्प्यात १७०० कोटी रूपयांचा पीकविमा अग्रीम वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. आज (दि.८) मंत्रालयात झालेल्या पीकविमा कंपन्यांसोबतच्या बैठकीत या कंपन्यांनी या अग्रीम वितरणास मंजुरीदेखील दिली आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास ३५ लाख शेतकर्यांना १७०० कोटी रुपयांची विमा अग्रीम रक्कम मिळणार असून, त्यात बुलढाणा जिल्ह्यातील ३६ हजार ३५८ शेतकर्यांचा समावेश आहे. या शेतकर्यांना १८ कोटी ३९ लाख रूपयांची पीकविमा अग्रीम रक्कम मिळणार आहे.
दरम्यान, पीकविमा कंपन्यांच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली असल्याने बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीकविम्याची अग्रीम रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल. खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल १ कोटी ७१ लाख शेतकर्यांनी सहभाग घेतलेला आहे. अंतरिम नुकसान भरपाईअंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रीम पीकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. यासंदर्भात, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पीकविमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांना अग्रीम रक्कम तातडीने देण्याबाबत तंबी दिली. त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यानी एकूण १७०० कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.