स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुती, महाआघाडीचे टेन्शन वाढवले!
– प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांची कोल्हापुरात घोषणा; लोकसभेच्या राज्यात सहा जागा लढविणार!
कोल्हापूर/मुंबई (संकेतराज बने) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरण्याची घोषणा करून महाविकास आघाडी व महायुतीचे टेन्शन वाढविले आहे. बुलढाण्यातून संघटनेचे नेते रविकांत तुपकर व कोल्हापुरातून प्रा. डॉ. जालिंदर पाटील हे दिग्गज नेते लोकसभा निवडणूक लढविणार असल्याने सत्ताधारी व विरोधक अशा दोघांनाही राजकीय फटका बसणार आहे. दरम्यान, बुलढाण्यात रविकांत तुपकर यांना अनुकूल वातावरण असून, स्थानिक पातळीवर इतर राजकीय पक्षाचे नेतृत्वदेखील तुपकरांच्या मदतीला येणार आहेत. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना पाडण्यासाठी बुलढाण्यात ‘अमरावती पॅटर्न’ राबविला जाण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार असल्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी जाहीर केली आहे. ते म्हणाले, जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर लोकसभा लढवण्यास माझ्या उमेदवारीवर संमती दिली तर मैदानात उतरणार आहे. इतकेच काय तर कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार उभा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जालिंदर पाटील हे उच्चशिक्षित आणि शेतकरी कायदे आणि शेतकर्यांच्या प्रश्नांची अचूक जाण असलेले नेते म्हणून परिचित आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, करवीर, पन्हाळा, चंदगड, कागल, गारगोटी तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वेगळा गट व कार्यकर्त्यांची जुनी फळी कार्यरत आहे. तर, बुलढाणा जिल्ह्यातील जनमत हे रविकांत तुपकर यांना अनुकूल असून, अमरावतीमध्ये ज्या प्रमाणे राष्ट्रवादी व भाजपने नवनीत राणा यांना राजकीय सहाय्य करून खासदार केले होते, तोच प्रयोग शेवटच्याक्षणी बुलढाण्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस करण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, बुलढाण्यात शाहू परिवाराचे संदीप शेळके हेदेखील लोकसभा लढविण्यास इच्छूक असले तरी त्यांच्या बाजूने जनमत नाही. केवळ पतसंस्थेच्या जोरावर खासदार होता येत नाही, याची जाणिव शेळके यांनाही असून, त्यांना कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळण्याचीही शक्यता नाही. मुळात ते रविकांत तुपकर यांच्यासमोर टिकावच धरू शकत नाही, असा या जिल्ह्यातील राजकीय सूर आहे.