‘एल्गार रथयात्रे’दरम्यान संतप्त शेतकर्यांनी सोयाबीन-कापूस जाळला; आंदोलन पेटणार!
– नुकसान भरपाई द्या, अन्यथा असे आंदोलन उभे करू की सरकारची झोप उडेल; तुपकरांनी शिंदे-फडणवीसांना ठणकावले!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, अशा परिस्थितीत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मात्र झोपेचे सोंग घेवून बसले आहे. निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी आज (दि.७) खामगाव तालुक्यातील संतप्त शेतकर्यांना सोयाबीन-कापूस जाळून सरकारचा तीव्र निषेध केला. जर सरकारने तातडीने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्यांकडे लक्ष दिले नाही तर येणार्या काळात एवढे तीव्र आंदोलन उभे करू की सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिला आहे. त्यामुळे यावर्षीचे सोयाबीन-कापूस आंदोलन चांगलेच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
यावर्षी सोयाबीन-कापसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे, त्या तुलनेत बाजारात मिळणार भाव अत्यल्प आहे. त्यात भरीसभर येलो मोझँक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे, उत्पादनात प्रचंड घट आली आहे, काढणी खर्चही परवडत नसल्याने अनेक शेतकर्यांनी उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या घुसविल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांना नुकसान भरपाईचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.
‘एल्गार रथयात्रे’च्या तिसर्या दिवशी आज सकाळी खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव, अंबेटाकळी व शिर्ला नेमाने या गावांमधील शेतकरी-शेतमजूर बांधवांशी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी संवाद साधला. बळीराजाची ताकद काय असते, हे सरकारला दाखविण्यासाठी २० नोव्हेंबरच्या बुलढाणा येथील एल्गार महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. गेले २ दिवस ”एल्गार रथयात्रा’ शेगाव व खामगाव तालुक्यात होती, जाईल त्या गावात शेतकरी-शेतमजूर बांधवांनी तुपकरांचे उत्स्फूर्त स्वागत केले. आता ‘एल्गार रथयात्रा’ मेहकर तालुक्यात दाखल होत असून, या तालुक्यातही शेतकर्यांचा जल्लोषात प्रतिसाद मिळत आहे.