– संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीन, कपाशीला एकरी दहा हजारांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारला ताकद दाखवून देऊ – रविकांत तुपकर
बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘परिवर्तन’ यात्रा काढणार्यांना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जिल्ह्यातील ‘एल्गार रथयात्रे’ने आपोआप जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे. जिल्ह्याचा कौल तुपकरांनाच असून, या एल्गार रथयात्रेने जिल्ह्यातील वारे फिरवले आहे. अस्मानी संकट व राज्यकर्त्यांच्या सुलतानी कारभारामुळे पिचलेले शेतकरी हजारोंच्या संख्येने एल्गार रथयात्रेत सहभागी होत असून, गावोगावी तुपकरांचे जल्लोषात स्वागत होत आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरचा बुलढाणा येथील मोर्चा विराट ठरण्याची शक्यता आहे. संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीन व कपाशीला एकरी दहा हजारांची नुकसान भरपाई व इतर शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी राज्यातील सरकारला शेतकर्यांची ताकद दाखवून देऊ, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.
संपूर्ण राज्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे. विदर्भ-मराठवाड्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येचे उंबरठ्यावर उभा आहे. दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील केवळ चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ दाखवून उर्वरित तालुक्यांमधील शेतकर्यांवर मोठा अन्याय केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दोनच तालुक्यांमध्ये शासनाला दुष्काळ दिसतो इतर तालुके मात्र दिसून येत नाही. सरकारच्या डोळ्यावरची ही धुंदी उतरण्यासाठी ही एल्गार रथयात्रा असून, २० नोव्हेंबरला होणार्या महामोर्चातून सरकारला शेतकर्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ, अशा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिला आहे. शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन तुपकर यांनी ५ नोव्हेंबररोजी एल्गार रथयात्रेला सुरुवात केली. याच दिवशी शेगाव तालुक्यातील गौलखेड, जलंब, पहूरजिरा तर खामगाव तालुक्यातील वाडी, माक्ता, माक्ता-वाडी, जळका भडंग, पिंपळगाव राजा, निपाणा, कुंबेफळ, ढोरपगाव भालेगाव व काळेगाव या गावांमध्ये ही यात्रा पोहोचली. तर आज, सहा नोव्हेंबररोजी खामगाव तालुक्यातील नांद्री, वर्णा, कंझारा, शिरसगाव देशमुख येथे यात्रेदरम्यान रविकांत तुपकर यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. दुपारनंतर रोहणा, खुटपुरी, मांडका फाटा, धापटी, गोंधणापूर फाटा येथे शेतकर्यांनी यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आवार, अटाळी, गौंढाळा, लाखणवाडा या गावांमध्ये सभा पार पडल्या. पहिल्या व दुसर्या दिवशी एल्गार रथयात्रेचा शेगाव व खामगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूरांनी जल्लोषात स्वागत केले.
या यात्रेत रविकांत तुपकरांसह श्याम अवथळे, वासुदेवराव उन्हाळे, डॉ.ज्ञानेश्वर टाले, अमोल राऊत, भगवानराव मोरे, नितीन राजपूत, अनंता मानकर, अक्षय पाटील भालतडक, नारायण लोखंडे, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, डॉ.विवेक सोनुने, कपिल पडघान, मधुकर शिंगणे, शेख जुल्फेकर, नाना पाटील, गजानन भोपळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.