Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbhaWorld update
ग्रामपंचायत निवडणुकांत नेत्यांनी गड राखले; जामोदात आ. कुटेंना धक्का!
– महाविकास आघाडीला २१ ग्रामपंचायती, महायुतीला १६ तर स्थानिक आघाड्यांचे ११ ग्रामपंचायतींवर वर्चस्व
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकालही अत्यंत धक्कादायक असे लागले आहेत. जिल्ह्यातील नेत्यांनी आपआपले गड राखले असून, जळगाव जामोदमध्ये मात्र भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांना धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत जामोद ही काँग्रेसने त्यांच्याकडून हिसकावून घेतली असून, ती आता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. बुलढाण्यात आ. संजय गायकवाड, मेहकर-लोणारमध्ये डॉ. संजय रायमुलकर या शिंदे गटाच्या आमदारांनी ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम राखले आहे. ग्रामपंचायत निवडणुका या कोणत्याही पक्षाच्या चिन्हांवर लढल्या जात नसल्या तरी हाती आलेल्या वृत्तानुसार, ४८ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक २१ ग्रामपंचायती या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी अशा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्या असून, त्या खालोखाल भाजप व शिंदे गटाला १६ तर स्थानिक आघाड्यांना ११ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत.
जिल्ह्यात सर्वात चर्चेची ग्रामपंचायतची निवडणूक होती ती जळगाव जामोद तालुक्यातील जामोद ग्रामपंचायतची. ही ग्रामपंचायत याआधी भाजपच्या ताब्यात होती. मात्र या ठिकाणी उलटफेर झाला व १७ पैकी १५ जागा जिंकत काँग्रेसने या ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला आहे. ही ग्रामपंचायतची निवडणूक डॉ. संजय कुटे यांनी मोठ्या प्रतिष्ठेची केली होती. जळगाव जामोद तालुक्यात एकूण तीन ग्रामपंचायती च्या निवडणुका होत्या. त्यापैकी दोन ग्रामपंचायत या काँग्रेसने जिंकल्या आहेत तर एक ग्रामपंचायती स्थानिक आघाडीने जिंकली आहे. बुलढाणा जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र शिंदे गटाचा दबदबा राहिला आहे. बुलढाणा व मेहकर तालुक्यात या गटाचे आमदार असल्याने या गटाने अनेक ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे.