वैद्यकीय अधीक्षकांना जाब विचारणार्या ग्रामस्थाविरोधात अॅट्रोसिटीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – येथील ग्रामीण रूग्णालयातील अनागोंदी कारभार, तसेच रूग्णांची होणारी परवड व उपचार करण्यास होणारी टाळाटाळ याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या मंगेश तिडके या ग्रामस्थाविरोधात देऊळगावराजा ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी पोलिसांत तक्रार दाखल करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, देऊळगावराजा पोलिसांच्या भूमिकेवरदेखील शंका निर्माण झाली आहे.
देऊळगावराजा येथील ग्रामीण रूग्णालयात अनागोंदी कारभार असून, येथील डॉक्टर व कर्मचारी हे रूग्णांना सौजन्याची वागणूक तसेच तातडीने उपचार देत नसल्याचा सर्वसामान्य ग्रामस्थांचा आक्षेप आहे. असाच वाईट अनुभव मंगेश तिडके यांनादेखील आला. याबाबत त्यांनी या रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण वानखेडे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, डॉ. वानखेडे यांनी तिडके यांच्याविरोधात देऊळगावराजा पोलिस ठाण्यात धाव घेऊन जातीवाचक शिवीगाळ (अॅट्रोसिटी), अश्लील शिवीगाळ व कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे, देऊळगावराजा पोलिसांनीदेखील इतक्या गंभीर आरोपाची वस्तुनिष्ठ चौकशी करणे अपेक्षित असताना, त्यांनीही गुन्हे दाखल करण्याची घाई केल्याचे जाणवते. त्यामुळे या घटनेला विनाकारण जातीयवादी वळण मिळण्याची शक्यता असून, तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
देऊळगावराजा पोलिसांनी डॉ. वानखेडे यांच्या तक्रारीवरून तिडके या जबाबदार ग्रामस्थाविरोधात शासकीय कामात अडथळा, जातीवाचक शिवीगाळ यासह भारतीय दंडविधानाच्या कलम ३५३, ३३२, १८६, २९४, ५०६ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रोसिटी) कलम ३(१) (आर )(एस) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (देऊळगाव राजा) अजयकुमार मालवीय हे करीत आहे.