रविकांत तुपकरांनी शेगावातून एल्गार रथयात्रेचा शंख फुंकला!
– फक्त ४० तालुक्यांतच नाही, सर्व राज्यात दुष्काळ जाहीर करा – रविकांत तुपकर
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य सरकारने केवळ ४० तालुक्यातच दुष्काळ घोषित केला असून, संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा. तसेच कापूस व सोयाबीनला चांगला दर मिळावा; या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार रथ यात्रा काढली आहे. शेगाव येथून या एल्गार रथयात्रेला सुरूवात झाली असून, संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सरकारला सुबुद्धी देवो अशी प्रार्थना तुपकरांनी केली. यावेळी तुपकर यांनी पत्नी शर्वरीताईंसह संत गजानन महाराजांची पूजा करत त्यांचे आशीर्वाद घेतले. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना सरकारने ४० तालुक्यात दुष्काळ घोषित केला. बाकी ठिकाणी धरणे ओसंडून वाहत आहेत का? असा प्रश्न तुपकर यांनी उपस्थित करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. जिल्ह्यातील हजारो शेतकरी स्वयंस्फुर्तीने पदरमोड़ करून शेगावात दाखल झाले असून, शेतकर्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही रथयात्रा सुरू झाली आहे.
सोयाबीन, कापसाला भाव नाही. खरीप हातातून गेले आहे, रब्बीपण हातात राहिले नाही. अश्या परिस्थितीत संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. सरकार शेतकर्याच्या जीवावर उठले आहे. आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारला झोपेतून उठवून जागे करण्यासाठी ही एल्गार यात्रा काढली आहे. ही एल्गार यात्रा जिल्ह्यातून जात २० तारखेला बुलढाण्यात मोठ्या भव्यमोर्चात समावेश होईल; अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली.
बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी खरिपात अपेक्षित पाऊस झालाच नाही. त्यामाने घाटावर तर फारच कमी पाऊस झाला. घाटाखाली काही तालुक्यात तुफान बरसला पण नुकसान करून गेला. त्यातच सोयाबीन हे नगदी पीक येलो मोझॅक रोगाने उभे वाळले तर कपाशी बोंड़अळीमुळे नेस्तनाभूत झाली. याबाबत ब्रेकिंग महाराष्ट्रनेदेखील वेळोवेळी सडेतोड वृत्त प्रकाशित केले होते. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी याबाबच मागणी लावून धरल्यावर शासनाला जाग आली व पंचनामे करण्याचे आदेश दिले, पण आता मदत व विमा देण्यासाठी शासन व विमा कंपनी हात आखड़त असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील घाटाखालील आठ महसूल मंड़ळात २१ पेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड़ पड़ल्याने तेथे २५ टक्के अग्रीम विमा देणार असल्याची माहिती आहे. पण जिल्ह्यातच पाऊस बरसला नसल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे मदत देणे गरजेचे आहे.
सोयाबीन, कपाशीसह इतर पीक नुकसानीची एकरी दहा हजार रूपये सरसकट मदत द्यावी, कापसाला भाववाढ द्यावा, पीकविमा त्वरित द्यावा, यासह शेतकर्यांच्या हक्काच्या व रास्त मागण्यांसाठी जिल्ह्यात एल्गार यात्रेच्या माध्यमातून गावोगावी फिरून शेतकर्यांना भेटून समस्या जाणून घेण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यातील सर्व आमदार व लोकप्रतिनिधी हे शेतकरीप्रश्नी मूग गिळून बसले असताना फक्त तुपकर हे रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत.