चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील शेलोडी येथील ४२ वर्षीय युवा शेतकरी मिलिंद महादेव गवई यांनी स्वतःच्याच शेतात गळफास लावून मृत्यूला कवटाळले. ही घटना शनिवारी शेतशिवारात घडली. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते. परंतु, कर्जाची परतफेड न करता आल्याने ते तणावात होते. तोंडावर आलेला दिवाळी हा सण व आर्थिक संकटांची मालिका यामुळे नैराश्य आल्याने त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले.
मिलिंद गवई यांच्यावर अनुराधा अर्बन बँकेचे चालू हंगामातील पीककर्ज दोन लाख रूपये होते. तसेच, शेतीसाठी घेतलेले इतरही हातउसणे व कर्ज होते. त्यांनी शेतात फळबाग लागवड केली आहे. परंतु, सततची नापिकी, पाऊस कमी, खते बियाणे, कीटकनाशक औषधे यांचे वाढते भाव, या तुलनेत शेतमालाला भाव नाही, आणि घटत चाललेले उत्पन्न इत्यादी बाबींमुळे त्यांना नैराश्य आले होते. तसेच, ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यातून स्वतःच्याच शेतात गळफास लावून जीवनयात्रा संपविली. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत. गवई यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच त्यांच्यावरील कर्ज माफ करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. मिलिंद गवई हे सामाजिक कार्यकर्ते तसेच शाळा समिती सदस्यदेखील होते.