Head linesPolitical NewsPoliticsVidharbha

मराठा समाजाचा अंत न पाहाता मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा किंमत मोजावी लागेल!

– मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवलीत जाऊन घेतली भेट, आंदोलनाला पाठिंबा जाहीर

जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाचा लढ्यात आम्ही आपल्यासोबत आहोत. सद्या हा लढा अंतिम टप्प्यात असल्याने आपली उद्यापासून (दि.१) सुरू होणारी सोयाबीन-कापूस एल्गार रथयात्रा तूर्तास स्थगित करत आहोत, अशी माहिती देत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे, तुपकर हे जेव्हा रूग्णालयात भरती होते, तेव्हा त्यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यांनी जरांगे पाटलांना भेटून त्यांना तुपकरांच्यावतीने पाठिंबा जाहीर केला होता. तर, आज स्वतः रविकांत तुपकरांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. सरकारने मराठा समाजाचा अंत न पाहता तातडीने आरक्षणप्रश्नी तोडगा काढावा, अन्यथा सरकारला यांची किंमत मोजावी लागेल, अशा इशाराही तुपकर यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिला आहे.

अंतरवली सराटी (जि.जालना) येथे जात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. याबाबत बोलताना तुपकर म्हणाले, की जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनकरीत्या खालावली आहे हे पाहून काळजाचे पाणी झाले. त्यांना विनवणी केली की आपण या आंदोलनाचा ऊर्जास्त्रोत आहात. आपल्या प्रेरणेने राज्यभरातील अनेक तरुण आपले सर्वस्व अर्पण करून आंदोलनात उतरले आहेत. आता ही आर या पारची लढाई निर्णायक वळणावर आलेली असतांना तब्येतीसोबत काही अप्रिय घडणे उचित होणार नाही. आंदोलनकर्त्यांचे आपण बळ आहात, तेव्हा सलाईन लावून घ्यावी किंवा किमान पाणी तरी प्यावे, ही कळकळीची विनंती त्यांना केली. तसेच, दरवर्षी आम्ही या कालावधीत सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन उभारतो व त्यांना न्याय मिळवून देतो. परंतु यावर्षी मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने आपली उद्यापासून नियोजित सोयाबीन-कापूस ‘एल्गार रथयात्रा तूर्तास स्थगित करत आहोत. लवकरच आपण सोयाबीन-कापूसप्रश्नी आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार आहोत. सध्या मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यावर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपण ताकदीने सहभागी आहोत. सरकारने मराठा समाजाचा अंत न पाहता तातडीने आरक्षणप्रश्नी तोडगा काढावा, अन्यथा सरकारला यांची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!