Breaking newsHead linesMaharashtra

मराठा-कुणबी एकच सरकारला आरक्षण द्यावेच लागेल; श्रीमंत शाहू छत्रपती यांनीही सरकारला ठणकावले!

– आत्महत्या, हिंसाचार करू नका, शाहू महाराजांचे मराठा आंदोलकांना आवाहन
– मंत्रिमंडळाचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी फेटाळला; सरसकट ओबीसी आरक्षण द्या, तातडीने विशेष अधिवेशन बोलवा!

जालना (जिल्हा प्रतिनिधी) – ‘मराठा कुणबी एकच आहेत. सगळ्यांचा व्यवसाय शेती आहे आणि सरकारला आरक्षण द्यावेच लागेल’, अशा शब्दांत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी राज्य सरकारला अंतरवली सराटी येथून ठणकावून सांगत, मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या प्राणांतिक उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज (दि.३१) कोल्हापुरातून अंतरवली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. तसेच, उपोषणस्थळी जात जरांगे पाटलांना पाठिंबा देत, तब्येतीचीही काळजी घेण्याचा वडिलकीचा सल्ला दिला. शाहू महाराजांचा सन्मान राखत मनोज जरांगे पाटलांनीही त्यांच्या हातून पाणी घेतले व पुढील दोन दिवस पाणी घेऊ, तरीही सरकारने न्याय दिला नाही तर जलत्याग करू, अशा इशारा सरकारला दिला.

याप्रसंगी श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, की मी सगळ्यांना सांगतोय, सगळे शेती करतात मग ते कुणबी आहेत. कुणबी आहेत ते मराठा आहेत. पूर्वीचे मराठेदेखील सहा महिने शेती करायचे, सहा महिने लढाईला जायचे. दोन्ही व्यवसाय करायचे. आपलाही विचार तोच आहे, म्हणून हे झाले पाहिजे. आता एकूण एक पुरावा मिळणं शक्य नाही, म्हणून एका पुराव्यावर आरक्षण मिळाले पाहिजे. १५ हजार पुरावे मिळाले ते महाराष्ट्रासाठी पुरेसे आहेत, असेही शाहू महाराज म्हणाले. दरम्यान, श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, सरसकट महाराष्ट्रालाच आरक्षण घेणार हे राज्य सरकारला ठणकावून सांगितले. तसेच, शाहू महाराजांना शब्द देत, राजांचा मान राखून दोन दिवस पाणी पिणार, दोन दिवसांत आरक्षण मिळाले नाहीतर पुन्हा पाणी सोडणार, असे सांगितले. याप्रसंगी श्रीमंत शाहू महाराजांनीदेखील सर्व मराठा आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. एकाही मराठ्याने आत्महत्या करू नये, हिंसाचाराचा कलंक लावून घेऊ नका, असेही त्यांनी बजावले. शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, समाजात दुफळी न होता आरक्षणासाठी मराठा बांधवांनी एकत्र आले पाहिजे. जरांगे पाटील यांना सहकार्य केले पाहिजे. जाळपोळ कोण करतंय हे मला माहिती नाही. तरीपण मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे शांततेत आंदोलन केले पाहिजे. जेणेकरून मराठा समाजावर अन्याय आणि ठपका दोन्ही पडता कामा नये. आत्महत्या करून आरक्षण मिळणार नाही. फक्त जीव जातील. हे जीव राहिले तर जोमाने काम करता येईल. युवकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
दरम्यान, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकारण्यात आला आहे. तसेच कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यास मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. याला मनोज जरांगे यांनी विरोध दर्शवला आहे. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावे, अशी जरांगे पाटलांची मागणी आहे.

दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती इथं आलेत, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही. गोरगरिबांना न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत. विशेष अधिवेशन बोलावून सरकारने समितीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाचा ओबीसीत सामावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावे. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही. निजामकालीन दस्तावेज शोधा, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अर्धवट दिले तर ते सरकारला जड जाईल. आज महाराज स्वत: येऊन आंदोलनाच्या पाठिशी उभे राहिलेत. सरकारने हे गांभीर्याने घ्यावे, असे मनोज जरांगे पाटील याप्रसंगी म्हणाले.

मालमत्तेचे नुकसान, जीवितहानी करणार्‍यांवर कठोर कारवाईचे सरकारचे निर्देश

मराठा आंदोलन राज्यात हिंसक वळण घेत आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बैठक घेतली. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. रात्री १० ते ११ अशी एक तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील जिल्हाधिकारी व सर्व पोलीस प्रमुख हजर होते. मराठा आंदोलनादरम्यान मालमत्तेचे नुकसान व जीवितहानी करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुन्हे दाखल करुन अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मालमत्तेचे नुकसान करणार्‍यांकडून भरपाई घेण्याबाबतदेखील बैठकीत चर्चा झाली. दुसरीकडे, मराठ्यांच्या तरुणावर खोटे गुन्हे दाखल करु नका. महाराष्ट्र शांत आहे. सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकार्‍यांसमोर जाऊन बसेन. त्यावेळी १० लाख किंवा ५ लाख मराठा समाज येईल हे सांगता येत नाही. मी बीडला आल्यास मराठा समाजाची ताकद समजेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावले आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!