– आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, मराठा समाजाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
देऊळगावराजा (अनिल दराडे) – मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे प्राणांतिक उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असताना, राज्य सरकारने अद्यापही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाच्यावतीने नागपूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगावमही येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्याचे दिसून आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे भर वाहतुकीच्या या मार्गावरील प्रवाश्यांचे हाल झाले.
मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत, मराठा समाजाने पुणे-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगावमही येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात परिसरातील मराठा व धनगर समाजातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे तर धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजाचे सुरेश बडगर हे चौंढी येथे उपोषणास बसले होते. त्यावेळी सरकारने त्यांना सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर आरक्षणाचा विषय मार्गी लागला नाही म्हणून हे दोन्ही लढे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात मराठा व धनगर समाजामध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. आजच्या रस्ता रोको आंदोलनामुळे हा महामार्ग बराचवेळ ठप्प पडल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच, मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार देऊळगाव राजा यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. यावेळी देऊळगावराजा पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
——————-