Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

जरांगे पाटलांची तब्येत ढासाळली; ‘बोलता येतं तोपर्यंत चर्चेला या’, सरकारला आवाहन!

– फडणवीसांना ‘जात’ आठवली!; ‘तुम्ही ब्राम्हण म्हणून नाही तर कटकारस्थानी आहात म्हणून लोकं दूषणं देत आहेत’ : खा. राऊतांनी फडणवीसांना सुनावले!

जालना/मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पाचव्या दिवशी प्रकृती खालावली असून, त्यांना कमालीचा अशक्तपणा आला आहे. मला बोलता येते तोपर्यंत चर्चेला या, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले असून, शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. दरम्यान, आजपासून गावोगावी आमरण उपोषण सुरू झाले असून, या आंदोलनाला बीड जिल्ह्यात मात्र हिंसक वळण लागले आहे. तसेच, मराठा समाजाने आमदार, खासदार, मंत्री यांना गावबंदी केल्याने अनेक मंत्र्यांनी आपले नियोजीत दौरे रद्द केले आहेत. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्वतःची जात आठवली होती. मी ब्राम्हण असल्यानेच मला टार्गेट केले जात आहे, असे फडणवीस म्हणाले होते. त्याचा खरपूस समाचार शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी घेतला असून, शिवसेनेने या राज्याला सर्वप्रथम ब्राम्हण मुख्यमंत्री दिला होता. तुम्ही ब्राम्हण असल्याने नाही तर तुम्ही कटकारस्थानी असल्याने लोकं तुम्हाला दूषणे देत आहेत, अशी टीका खा. राऊत यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांचा हात थरथरत होता. माईकही हातातून खाली पडला. मात्र क्षीण झालेल्या आवाजातही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका मांडली. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपचार न घेण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त करत, आरक्षण हेच माझे उपचार आहे, असे म्हणत आपण आरक्षण घेऊच, पण कोणीही आत्महत्या किंवा उग्र आंदोलन करू नये, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. शांततेच्या मार्गानेच मराठ्यांना आरक्षण मिळणार असून, सर्वांनी आपली एकजूट कमी होऊ देऊ नका, असेही ते म्हणालेत. मराठा समाजातील तरुणांनी आपआपल्या गावात आमरण उपोषण सुरू केले असेल तर पोलिस ठाण्यात माहिती, अर्ज द्या. आत्महत्या करू नका. राज्य सरकारशी अद्याप संवाद नाही, असे सांगून, आणखी तीन दिवस सरकारची वाट बघू. त्यांना माणुसकी समजत नसेल तर आमची ताकद त्यांना दाखवून देऊ, असा इशाराही जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.२९) शरीर थकल्याने थरथरत्या शब्दांत पत्रकार परिषद घेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला उत्तर दिले. ‘मीडियाच्या माईकसमोर संवाद होऊ शकत नाही,’ असे फडणवीस टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत म्हणाले होते. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, ‘सरकारने काही संवाद साधला नाही. चर्चेला या, आम्ही अडवणार नाही.’ मला बोलता येतंय, तोवर चर्चेला या, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीसांना आता ‘जात’ आठवली!; ब्राम्हण म्हणून नाही तर तुम्ही कारस्थानी आहात म्हणून लोकं दूषणं देत आहेत – खा. राऊत

मी ब्राह्मण आहे आणि मी माझी जात बदलू शकत नाही. मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी केवळ राजकारण केले असे लोक मला लक्ष्य करत आहेत. त्यांना माहीत आहे की, मी सॉफ्ट टार्गेट आहे, याला टार्गेट करा, अशी त्यांची मानसिकता दिसते, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केले होते. त्याला शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. खा. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात जाती-पातीसंदर्भात अशी भाषा यापूर्वी कोणी केली नव्हती. महाराष्ट्राने बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यासारखा मुस्लीम मुख्यमंत्री स्वीकारला आहे. दलित मुख्यमंत्री स्वीकारला आहे. या राज्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला. तेव्हाही महाराष्ट्राने त्या निर्णयाला विरोध केला नाही. कारण, महाराष्ट्रात कर्तबगारीला महत्त्वं आहे, जातीला नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे तो यासाठीच. महाराष्ट्र हा जात-पात, धर्म न मानता राजकारण समजाकारणात काम करतोय. खा. राऊत यांनी फडणवीसांना उद्देशून प्रश्न उपस्थित केला, की तुम्हाला आत्ताच का आठवले की तुम्ही ब्राह्मण आहात. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तुम्ही पाच वर्षे राज्य केलंत, तेव्हा कधी मी ब्राह्मण आहे म्हणून मला टार्गेट केले जातंय असे वक्तव्य तुम्ही केले नाही. तुमची कारस्थाने उघड झाल्यानेच लोक तुम्हाला दूषणं देत आहेत. मी दूषणं म्हणेन, शिव्या हा शब्द वापरणार नाही. तुमची कारस्थाने उघड झाली, त्यामुळेच तुम्हाला आता वाटते की, तुम्हाला टार्गेट केले जातंय. तुमच्या कपटी व कारस्थानी कारभारामुळे हा महाराष्ट्र तुम्हाला दूषणं देत आहे, असे सडेतोड मतही खा. राऊत यांनी व्यक्त करून, देवेंद्र फडणवीसांना उघडे पाडले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षणाबाबत खुली चर्चा करण्यासाठी जरांगे यांनी शिंदे-फडणवीस यांना अंतरवालीत येण्याची ऑफर देखील दिली आहे. नेत्यांना आम्ही गावबंदी केली असली तरी शिंदे – फडणवीस यांनी खुल्या चर्चेसाठी अंतरवालीत यावं, तुम्हाला कुणीही धक्का लावणार नाही, आपण खुली चर्चा करू, असे जरांगे म्हणालेत. समितीला 10 हजार पुरावे सापडले आहेत. पुरावे कुठेही जमा करा, पण आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला लागू करा. आरक्षण फक्त मराठवाड्यासाठी द्यावे, ही माझी मागणीच नाही त्यामुळे अर्धवट आरक्षण मी घेणारही नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

 

बीड जिल्ह्यात हिंसक वळण, बसवर दगडफेक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलकांनी बीड जिल्ह्यात आत्महत्या वâेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मध्यरात्री बायपास रोडला टायर जाळून निषेध करण्यात आला. तर बीडच्या धुळे-सोलापूर रोडवर एक बस जाळण्यात आली. आज सकाळी पुन्हा एकदा बीडपासून काही अंतरावर असलेला चराटा फाटा या ठिकाणी कल्याण गाडीची तोडफोड करण्यात आली. या जिल्ह्यात रात्री बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा सकाळी बस चालू होताच आंदोलकांनी बीडच्या सराटा फाटा रोडला कल्याण गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत या गाडीचे नुकसान केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. आंदोलक हिंसक भूमिका घेत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी एसटी बसेस जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात आदेश दिले आहेत.


माजी उपसरपंचाने केली आत्महत्या

लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा येथले माजी उपसरपंच व्यंकट ढोपरे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे. दरम्यान, त्यांचा मृतदेह शिरूर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयात ठेवण्यात आला होता. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिल्याने तात्काळ सरकारने आरक्षण द्यावे, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० लाखांची मदत जाहीर करावी, या मागण्या घेऊन सकाळपासून व्यंकट ढोपरे यांचा मृतदेह तहसील कार्यालयात ठेवला गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!