– तब्बल ५ हजार पदांसाठी घेतल्या जाणार मुलाखती – जास्तीत जास्त नोकर्या मिळण्यासाठी उमेदवारांना देणार भरतीपूर्व प्रशिक्षण
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली येथे दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ रोजी भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या महामेळाव्यात ५० मोठ्या कंपन्या रोजगार भरतीसाठी येणार आहेत. तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले आहे. विशेष म्हणजे, या महामेळाव्यात जास्तीत जास्त तरूण-तरूणींना नोकर्या मिळाव्यात, यासाठी नाव नोंदणी झालेल्या उमेदवारांना विविध गावांत नोकर भरतीपूर्व प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षणक्षेत्रात आपल्या प्रगतीआलेखाचा उच्चांक गाठून कार्याचा ठसा उमटविणार्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे मित्र मंडळाच्यावतीने दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ रोजी भव्य महारोजगार मेळावा-२०२३ चे मौनीबाबा संस्थान चिखली येथे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत रोजगार उपलब्ध करून देण्यास विद्यमान सरकारचे उदासीन धोरण, कंत्राटी भरती, व्यवसाय उभारणीकरिता येणार्या असंख्य अडचणी, इत्यादी बरोबरच बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता सुशिक्षीत बेरोजगार पदवीधर तरूणांमध्ये कमालीचे नैराश्य व उदासीनता पसरल्याचे अनुभवयास येत आहे. सुशिक्षीत, पदवीधर, तरूणांमध्ये पसरलेली मरगळ झटकून काढून त्यांच्या जीवनाला वेगळी दिशा देण्याच्या उदात्तहेतूने या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील ५०हून अधिक नामांकित कंपन्या मेळाव्याला येणार असून, सुमारे ५ हजार पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. मित्र मंडळाव्दारे आयोजित या मेळाव्याचा लाभ जिल्हासह चिखली मतदारसंघातील दहावी, बारावी, आय.टी.आय., विविध शाखेतील पदवीधर, तथा सर्व सुशिक्षीत तरूण, तरूणींनी घ्यावा, असे आवाहन माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
औद्यागिक व यांत्रिकी क्षेत्रात मागासलेल्या बुलढाणा जिल्ह्यासह चिखली विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षीत तरूण तरूणींना यशस्वी भविष्य निर्मीतीकरीता अनुराधा परिवाराचे सर्वेसर्वा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून तथा मित्र मंडळाव्दारा आयोजित या महारोजगार मेळाव्यात देशातील ५० पेक्षा अधिक विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनधी उपस्थित राहून सुमारे ५ हजार पदांसाठी थेट मुलाखती घेवून पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. या महारोजगार मेळाव्यात अभियांत्रीकी क्षेत्राशी निगडी आय.टी., बँकींग, उत्पादन क्षेत्र, रिटेल, अॅग्रीकल्चर, फायनान्स, बी फॉर्म, नर्सिंग, लॉजीस्टीक्स, एफएमसी, इत्यादी सेवा क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत. पात्र ठरलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र यावेळी देण्यात येणार आहे.
नाव नोंदणी आवश्यक, अनेक गावांत दिले जाणार भरतीपूर्व प्रशिक्षण
स्थानिक मौनीबाबा संस्थानच्या सभागृहात दिनांक ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न होणार्या या महारोजगार मेळाव्याची नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सहभागी होणार्या दहावी, बारावी, आय.टी.आय., विविध शाखेतील पदवीधर, तथा सर्व सुशिक्षीत तरूण तरूणींनीना या मेळाव्यात येणार्या कंपन्यामध्ये निवड होण्याकरीता मुलाखतीचे प्रशिक्षण तालुकाभर देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण दि. २६ ऑक्टोंबर ते ०४ नोव्हेंबर या कालावधीत विधानसभा मतदारसंघील उदयनगर, अमडापूर, मंगरूळ नवघरे, एकलारा, पेठ, शेलसूर, केळवद, रायपूर, अनुराधा नगर, पळसखेड दौलत, कोलारा, बेराळा, धाड, मासरूळ, चांडोळ, दुधा, केटीबी फार्मसी कॉलेज चिखली, आयएमए हॉल रेणुका पेट्रोल पंपाजवळ चिखली, बुध्दविहार जाफ्राबाद रोड चिखली, तक्षशिला हायस्कुल चिखली या ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण काळामध्ये विविध कंपन्याकडून घेण्यात येणार्या मुलाखतीदरम्यान येणारी प्रश्नोत्तरे इत्यादी बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी करणे तथा प्रशिक्षण वर्गाला उपस्थितीत असणे गरजेचे असल्याचे आयोजकांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
———