– मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ तालुक्यातील राहेरी बुद्रूक या गावाने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमदार, खासदार, नेत्यांना गावबंदी जाहीर केली आहे. अशा प्रकारे राजकीय पुढार्यांना गावबंदी जाहीर करणारे हे जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे. इतर गावांतही हे लोण पोहोचू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
आज, दि. २७ ऑक्टोबररोजी पुढार्यांना गावबंदी संदर्भातील फलक गावाच्या प्रवेशद्वारावर झळकावत ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी ग्रामस्थांनी परिसर दणाणून सोडला होता. सोबतच यावेळी गावाच्या प्रवेशद्वारावर झळकवण्यात आलेल्या फलकावरच राजकारण्यांनी अकारण गावात येऊन अपमान करून घेऊ नये, अशी तंबीही ग्रामस्थांनी दिलेली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्येही यामुळे आता नेत्यांना गावबंदी केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.