देशात येणारा काळ दंगलींचा; गोध्रा, मणिपूर घडविण्याचा भाजपचा डाव – प्रकाश आंबेडकर
– आगामी निवडणुकीआधी पाचशेची नोट बंद होणार असल्याचा केला दावा!
– आम्हाला आघाडीत घ्या अथवा घेऊ नका, पण मोदी सरकारचा गैरव्यवहार बाहेर काढा – इंडिया आघाडीला दिला सल्ला
अकोला/बुलढाणा (बाळू वानखेडे) – देशात दिवाळीनंतरचा काळ वाईट असून, दंगलींचा काळ सुरू होणार आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी गोध्रा, मणिपुरासारख्या दंगलींची पुनरावृत्ती घडविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचा ड़ाव आहे, असा थेट व गंभीर आरोप करत यांच्या कोणत्याही भूलथापा व प्रचाराला बळी न पड़ता आगामी निवड़णुकीत मतांचा योग्य वापर करत नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाड़ीचे अध्यक्ष तथा घटनाकार ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब उपाख्य अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. आम्हाला आघाड़ीत घ्या अथवा घेऊ नका, पण मोदी सरकारचा गैरव्यवहार बाहेर काढा, असा सल्लाही त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना यावेळी दिला.
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा अकोल्याच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित विशाल धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. आंबेडकर हे बोलत होते. एक नेता, एक मैदान व लाखोचा निळ्या पाखरांचा थवा असे समीकरण गेल्या ४० वर्षांपासून आजही अविरत सुरूच असल्याचे या विराट सभेच्यानिमित्ताने दिसून आले. वंचित आघाडीला भाजपची बी-टीम म्हणणारे आज अर्धा पक्ष घेऊन राज्यात बीजेपीबरोबर सत्तेत जावून बसले, असा टोला यावेळी युवानेते सुजातदादा आंबेडकर यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. मनुवाद्यांना आपली प्रगती खुपत असून, नकली आंबेडकरवाद्यांपासून सावध रहा, असा सल्लाही त्यांनी दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अंजलीताई आंबेडकर, अमन आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, युवा प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगिता अढाव, महासचिव राजेंद्र पातोड़े, यू. जी. बोराड़े, अरूंधती सिरसाट, धैर्यवर्धन पुंड़कर, अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंड़वे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे, सविताताई मुंढे, वाशिम जिल्हाध्यक्षा किरण गिर्हे, प्रमोद वानखडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून अकोल्यातील समस्यांना हात घातला. अकोल्यातील रस्त्यांची अवस्था भयावह असून, मनपा टॅक्स भरपूर घेते पण सुविधा पुरवत नाही, असा आरोप करत वंचितवर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्ता वंचितांच्या हाती देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी भाजपाने सगळा सत्यानाश केला असा आरोप करत, बाळासाहेब आंबेडकर ठरवतील तोच राज्याचा पुढचा मुख्यमंत्री होईल, असे ठामपणे सागितले. यावेळी नीलेश विश्वकर्मा, राजेन्द्र पातोड़े, यू.जी.बोराड़े, सौ.प्रभा सिरसाट, किरण गिर्हे, अरूंधती सिरसाट, धैर्यवर्धन पुंड़कर, जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता अढाव, मजहरखान सह मान्यवरांची विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक रमेश गवळी यांनी केले. प्रथम भन्ते बी.संघपाल यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. यावेळी लाखाच्या संख्येने आंबेड़करी अनुयायी उपस्थित होते. प्रथम शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संस्थांच्यावतीने भोजनदान देण्यात आले. तसेच आरोग्य शिबिरसुध्दा घेण्यात आले.