ऊसतोड कामगार, शेतकर्यांचा संघर्षयोद्धा हरपला; बबनराव ढाकणे यांचे निधन
– पाथर्डी येथे आज दिवसभर अंत्यदर्शन, उद्या पागोरी पिंपळगाव येथे दुपारी अंत्यविधी
– नगर जिल्ह्यात शोककळा, राजकीय, सामाजिक, कामगार क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त
शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – संघर्षयोद्धे, शेतकरी, उसतोड कामगारांचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्यावर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्यूमोनिया आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरूवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती या खासगी रूग्णालयाचे प्रमुख डॉ. एस. एस. दीपक यांनी प्रसारमाध्यमांना दिली. बबनराव ढाकणे यांचे पार्थिव पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज (दि.२७) दुपारी एक ते उद्या (दि.२८) दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असून, नगर जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्पेâ ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे हे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ऊर्जा संसाधनमंत्री होते. ते विद्यार्थीदशेपासूनच समाजकारणात सक्रिय होते. त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहातही सहभाग घेतला होता. गेल्यावर्षीच त्यांच्या जीवन कार्यावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी बबनराव ढाकणे यांनी केलेले भावनिक भाषणही चांगलेच गाजले होते. ऊसतोडणी कामगारांचे नेते म्हणून बबनराव ढाकणे परिचित होते. तीनवेळा विधानसभा सदस्य, एकवेळ विधान परिषद सदस्य, एक वेळ खासदार व त्याचवेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्रीपद भूषवलेले बबनराव ढाकणे परिवारात व ऊसतोडणी विश्वात ‘साहेब’ म्हणून परिचित होते. पाथर्डी तालुक्यातील अकोले सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदापासून थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांनी झेप घेतली होती. संघर्षयोद्धा म्हणून ते ओळखले जात असत. त्यांच्या निधनानंतर भावना व्यक्त करताना त्यांचे चिरंजीव अॅड. प्रतापकाका ढाकणे म्हणाले, ते माझे वडील होते, पण त्यापेक्षा जास्त माझे ते गुरू होते. मला घडवून माझ्यात संघर्ष रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने मी पोरका झालो आहे.
बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थीदशेतच थेट दिल्लीला जाऊन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १९५१ मध्ये भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन ठरले. गोवामुक्ती सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला. तसेच पाथर्डी तालुक्यातील विकासाबाबत विधानसभेत जाऊन पत्रके भिरकावली होती. बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा यशाचा टप्पा राहिला. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री होते. जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काँग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले. उसतोडणी कामगार, शेतकरी, बेरोजगारी अशा विविध विषयांना त्यांनी अत्यंत आक्रमकपणे हात घातला. दिवंगत ढाकणे यांना पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा सहवास लाभला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळाही त्यांनी पाथर्डीत उभा केला.
उद्या होणार अंत्यसंस्कार
दिवंगत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एकपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव (तालुका पाथर्डी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बबनराव ढाकणेंच्या भाषणाने मुलगा प्रतापकाका ढसाढसा रडले!
गेल्यावर्षी अहमदनगर येथे बबनराव ढाकणे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. या प्रकाशन सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बबनराव ढाकणे यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते. हे भाषण ऐकून त्यांचे पुत्र प्रतापकाका ढाकणे यांना अश्रू अनावर झाले आणि ते व्यासपीठावरच ढसाढसा रडले होते. या भाषणात बबनराव ढाकणे यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली होती. एक गोष्ट मला वाईट वाटते, मी अनेकांचा मित्र राहिलो, रस्ताभर फिरत राहिलो. पण कुटुंबाकडे मी दुर्लक्ष केले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. नातेवाई, मित्र, मुले, नातवांचा माझ्यावर राग आहे. एवढे सगळे केले आणि आम्ही कोण आहोत असे झाले. आता प्रतापच्याही जीवनात तोच संघर्ष आला आहे. पण, त्या संघर्षाला तो कंटाळला नाही. तीनवेळा सलग पराभव झाला. सत्ता वगैरे काही नाही, सत्ता ही महत्त्वाची नव्हती. त्याच्याही पुढे संघर्ष आलाय, तुमच्या जीवावर उलटणार तो जोपर्यंत तुमची ताकद आहे तोपर्यंत, त्याचा कितीही वेळा पराभव होऊ द्या. मी कधी माझ्या मुलाबाळांना जवळ घेतले नाही. पण, आज त्याने चांगले काम केले. म्हणून मी हार घालून माझ्या मुलाचा सत्कार तुमच्यादेखत करणार आहे. अपयश पचवणे फार कठीण असते. वेडा होतो माणूस. पण मी त्याला सांगू इच्छितो की तुम्हा आम्हाला जी ताकद दिली आहे ती जनता-जनार्दनाने दिलेली आहे. पराभव पचवण्यातच सत्ता आहे, असे बबनराव ढाकणे यांनी म्हटले होते. आणि, भाषणादरम्यान प्रतापकाकांच्या गळ्यात हार घालत असतानाच प्रतापकाका लहान मुलाप्रमाणे भर व्यासपीठावर ढसाढसा रडले होते. हा प्रसंग पाहणार्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते.
विधानसभेतील उडी गाजली होती..!
सन १९६७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी पाथर्डीतील विद्युतीकरणाच्या प्रश्नावर विधानसभेच्या गॅलरीतून पत्रके भिरकावून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना मोठी गाजली. त्यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंगाचा ठरावही करण्यात आला. त्यांना सरकारने माफी मागण्यास सूचवले होते. परंतु जनतेसाठी आपण आंदोलन केले, असे सांगत त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांना सात दिवस कारावासाची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी स्वतः या प्रश्नावर बैठक बोलून दोन महिन्यात मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याची पूर्तता करीत मुख्यमंत्री नाईक पाथर्डीत आले होते. बबनराव ढाकणे यांच्या विनंतीनुसार महाराष्ट्रातील दुष्काळा दौरा करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाथर्डी तालुक्यात भेट दिली होती. त्यामुळे १९७२ ते ७५ दरम्यान पाथर्डी तालुक्यात ११० पाझर तलावांची निर्मिती झाली. अवघे नववीपर्यंत शिक्षण झालेल्या बबनराव ढाकणे यांनी अनेक चळवळी व आंदोलने केलेत. त्यासाठी कारावास भोगला. ऊस तोडणी मजुरांच्या प्रश्नावर त्यांचा तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी संघर्ष झाला होता. काँग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास त्यांनी केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्थेचीही स्थापना केली. राजकारणात गोपीनाथ मुंडेपर्वाचा उदय झाला आणि बबनराव ढाकणे यांच्यासारख्या संघर्षशील वंजारी नेतृत्वाच्या नशिबी राजकीय वनवास आल्याचे दिसून आले.