बिबी (ऋषी दंदाले) – राज्य सरकारच्या सेवेत कायमस्वरूपी समावून घेण्यात यावे, या मागणीसाठी बिबी येथील ग्रामीण रूग्णालयातील आयुष विभागाच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांनी काल (दि.२६) एक दिवशीय कामबंद आंदोलन केले. त्यामुळे रूग्णांचे चांगलेच हाल झाले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन या डॉक्टर व कर्मचार्यांनी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बुरकूल यांना दिले.
बिबी ग्रामीण रुग्णालयात दररोज २०० ते ३०० रुग्णांची तपासणी केली जाते. मात्र रुग्णालयाचा अर्धा भार हा आयुष विभागाच्या डॉक्टर व वैद्यकीय अधिकार्यांवर आहे. गेल्या १४ ते १५ वर्षापासून एनएचएम अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर आयुर्वेद होमिओपॅथिक व युनानी वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, त्यांना अद्याप शासकीय सेवेत कायम करण्यात आलेले नाही. त्यामुळे या डॉक्टर व वैद्यकीय अधिकार्यांनी काल (दि.२६) काम बंद आंदोलन केले. त्यामुळे आलेल्या रुग्णांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागात होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी उपचार पद्धतीची गरज भासत असून, रुग्णांना फायदा होत आहे. मात्र कंत्राटी पद्धतीमुळे या डॉक्टरांना वर्ग चार कर्मचारी यांच्यापेक्षा कमी मानधनावर काम करावे लागत असल्यामुळे कायम सेवेत समाविष्ट करण्यासाठी आयुष्य विभागाच्या डॉक्टर वैद्यकीय अधिकारी यांनी मागणी केली आहे.