– सरसकट एकरी दहा हजारांची मदत द्या!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – येलो मोझेकसह बोंड़अळी व इतर नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन, कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. यासाठी शासनाने सरसकट एकरी दहा हजार रुपये मदत द्यावी, यासह विविध मागण्यांबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी (दि.२३) सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
सोयाबीन पिकावर पडलेला यलो मोझेक हा रोग, व कपाशी पिकावर पडलेली बोंड़अळीसह पावसाचा खंड़ पड़ल्याने सोयाबीन, कापूस आदीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. या नुकसानीची एकरी दहा हजार रूपये सरसकट मदत द्यावी, तसेच कापसाला दरवाढ द्यावी, हक्काचा पीकविमा मिळावा यासह इतर रास्त व हक्काच्या मागण्यासाठी आयोजित पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुलढाणा येथील विश्रामगृह येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतकरी, शेतमजुरांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी हक्काच्या मागण्यांसाठी सदर बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केले आहे.