– काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीने केले होते जोरदार आंदोलन
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने कंत्राटी भरतीचा काढलेला अध्यादेश (जीआर) अखेर जनमताच्या रेट्यामुळे रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. याप्रश्नी काँग्रेसने आजपासून तीव्र आंदोलन हाती घेतले होते. या आंदोलनामुळे संतप्त असलेले जनमत विरोधात जाण्याची भीती वाटल्याने हा जीआरच रद्द करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तथापि, या जीआरचे खापर त्यांनी तत्कालिन ठाकरे सरकारवर फोडले आहे.
राज्यातील कंत्राटी भरतीवरुन सध्या विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. यासाठी महाविकास आघाडीने आंदोलनही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, ही जीआरच रद्द करत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, की कंत्राटी भरतीसंदर्भात आमच्या सरकारवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे पाप काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील असून, याचे खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही यांच्या चेहर्यावरील बुरखा आता फाडला असून, आमच्या सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असतानाच कंत्राटी पद्धतीने भरतीचा पहिला निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१० मध्ये पहिल्यांदाच या संदर्भातला जीआर काढण्यात आला, असल्याची माहितीदेखील फडणवीस यांनी दिली. सर्वात आधी शिक्षक भरतीचा कंत्राटी जीआर अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. चव्हाण यांच्या नंतरच्या काळाज पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासंदर्भातला जीआर काढण्यात आला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कंत्राटी पद्धतीने भरती संदर्भात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची फडणवीसांवर जोरदार टीका; हे तर ‘गिरे भी तो टांग उपर..’!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कंत्राटी भरतीसाठी मागच्या सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तहसीलदार, नायब तहसीलदार ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ६ सप्टेंबर २०२३ रोजी जी.आर. कोणी काढला, याचे उत्तर आधी फडणवीसांनी द्यावे, असे आव्हान माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत दिले. जळगाव जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची जाहिरात दिली. याबाबत त्यांना विचारले असताना त्यांनी राज्य सरकारने ६ सप्टेंबर २०२३ ला जी.आर. काढला. त्यानुसार ही जाहिरात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्यात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याविरोधात युवकांमध्ये असंतोष निर्माण झाला. या असंतोषाला हे सरकार घाबरले व काढलेला जीआर रद्द केला, असेही देशमुख यांनी सांगितले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र डागले. हे म्हणजे, फडणवीसांचे गिरे भी तो टांग उपर असे आहे, असा टोला पटोले यांनी हाणला.
————-