Breaking newsBuldanaBULDHANACrimeHead linesVidharbha
बुलढाण्यातील नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरला नागडे करून हाणले; व्हिडिओ शुटिंग करत २० लाखाची खंडणी मागितली, साडेआठ लाख लुटले!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा शहरातील नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरला घरी पेशंट तपासण्याच्या बहाण्याने बोलावून, त्यांना नागडे करून बेदम मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करत तब्बल २० लाखांची खंडणी मागण्यात आली. तसेच, या डॉक्टरकडून साडेआठ लाख रूपयेही उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली असून, याप्रकरणी काल रात्री उशिरा या डॉक्टरच्या तक्रारीवरून बुलढाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून यातील पाच आरोपींना अटक केली असून, इतर आरोपी पसार झालेले आहेत. पोलिस त्यांचाही कसून शोध घेत आहेत. या प्रकरणात काही ‘नाजूक कांगोरे’ असल्याची चर्चा बुलढाण्यात सुरू होती.
बुलढाण्यातील नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरला या टोळक्यांनी कॅन्सरचा रुग्ण तपासण्यासाठी शहरातील खांमगाव रोडवरील एका घरात बोलवून त्याच्या गळ्याला सुरा लावून मारहाण केली होती, तसेच त्याच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, वेळोवेळी या डॉक्टरांकडून साडेआठ लाख रुपये लुटले आहे. प्रकरणी या युवकांवर खंडणी, दरोड्यांसह विविध कलान्वये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी अजय नंदकुमार नागपुरे (वय ३० रा. शिवशंकरनगर, बुलढाणा) यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले. परंतु तोपर्यंत बातमी प्रसारित झाल्याने आरोपी दिक्षांत ब्रम्हचारी नवघरे (वय २३ वर्ष रा. जुनागांव वा. न.१० बुलढाणा) विशाल मनोहर गायकवाड (वय २४ वर्षे रा. पोलीसमित्र वसाहत चिखलीरोड, बुलढाणा) आदेश सुनील राठोड (वय १९ वर्षे रा. क्रीडा संकुलरोड, बुलढाणा) सुरज मोतीराम पसरटे (वय २० वर्षे रा. तारकॉलनी, बुलढाणा) दीप नारायण अंभोरे (वय २१ वर्ष रा. हिवरा आश्रम, ता. मेहकर) हे फरार झाले होते. बुलढाणा पोलिसांनी रात्रीच आरोपी अटकेची मोहिम हाती घेवून सदर आरोपी यांना मोबाईल लोकेशनचे आधारे ट्रेस करुन मोठ्या शिताफीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निपानी आडगांव शिवारातून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेवून पुढील तपास पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीस पोलीस अधिकारी वाघ यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रल्हाद काटकर बुलढाणा शहर हे करीत आहेत.
या टोळक्याने 13 तारखेला या डॉक्टरला मारहाण करत त्यांच्याजवळील १० हजार रुपये लुटले, तसेच डॉक्टरांच्या मुलांनादेखील जीवे मारण्याची धमकी दिली. यासह डॉक्टरचे कपडे काढून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, खंडणी म्हणून २० लाख रुपये मागितले. अॅडव्हान्स म्हणून तब्बल साडेआठ लाख रुपये या डॉक्टरांकडून वसूलदेखील करण्यात आले आहेत. घाबरलेल्या डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आठ जणांविरोधात बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी पाच जणांना लोकेशन ट्रेस करत छत्रपती संभाजीनगर येथून बुलढाणा पोलिसांनी अटक केली तर इतर आरोपींच्या शोधात पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत.