गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी) – सध्या गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांना याचा जबर फटका बसला आहे. अहेरी उप विभागातील काही गावांना दरवर्षीच पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो. प्रशासन या गावातील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र स्थलांतरित करून मदत करते. मात्र, यामुळे त्यांचा प्रश्न मिटणार नाही. त्यामुळे अश्या पूरग्रस्त गावात, वस्त्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करा, अशी मागणी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या.
अहेरी उपविभागात मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश होतो. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका या पाचही तालुक्यांना बसला आहे. अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील सर्वात जास्त नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. यातील काही गावातील नागरिक सुरक्षित ठिकाणी नविन वस्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केले मात्र, वन विभागाच्या अडचणी मुळे त्यांना हे शक्य झाले नाही. त्यात अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा गावातील काही वस्त्यांचा आणि लिंगमपल्ली गावाचा समावेश आहे. या गावातील नागरिकांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. या आणि आदी गावातील नागरिकांना नवीन वस्ती निर्माण करण्यासाठी प्रशासनातर्फे जमीन देण्यासाठी त्यांना निर्देश द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ताईंनी केले. सध्या मागील दोन वर्षांपासून आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली असून रुग्णांना, गर्भवती महिलाना व इतर प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यासह इतरही रस्ते त्वरित दुरुस्त करावे असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
11 जुलै रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रथमच एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्यात आले होते. जिल्ह्यात आगमन होताच भाग्यश्री ताई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि ही मागणी रेटून धरली. पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नेहमी संपर्क तुटणाऱ्या आणि पूरग्रस्त गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देशही दिले हे विशेष.