हिवरा आश्रम (बुलडाणा) – जीवंत माणसांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे, असे सांगत आयुष्यभर पीडित, दुःखी, वेदनांनी व्याकूळ झालेल्या जीवांची सेवा करणारे निष्काम कर्मयोगी तथा मानवहितकारी संत पू. शुकदास महाराज यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद आश्रमात बुधवारी (दि.१३) गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूपूजनोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त भव्य रोगनिदान शिबीर व मोफत औषधी वाटप, पू. शुकदास महाराजश्रींच्या समाधीचे पूजन आणि विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम विवेकानंद आश्रमात पार पडणार आहेत.
विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी सांगितले, की विवेकाची, समतेची, आणि श्रमाची मशाल पेटवून पू. शुकदास महाराजश्रींनी युगाचार्य स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीमंत कर्मयोगाचे सर्वांग सुंदर असे उदाहरण, विवेकानंद आश्रमाच्या स्थापनेने हिवरा आश्रम येथे घडविले आहे. रामकृष्ण परमहंस यांना अपेक्षित असलेले जीवंत देवाच्या सेवेचे कार्य महाराजश्री होते तेव्हाही, आणि आता ते महानिर्वाणस्थ झाले तरीही अव्याहत सुरुच आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त बुधवारी विवेकानंद आश्रमात गुरूपूजनोत्सव पार पडत असून, यानिमित्त सकाळी ७ वाजता ग्रामस्वच्छता, त्यानंतर हरिहरतीर्थावर महाआरती व दिंडी परिक्रमा पार पडणार आहे. सकाळी ८ वाजता पूज्यनीय महाराजश्रींच्या संजीवन समाधीचे पूजन, आणि तदनंतर विवेकानंद स्मारकावर युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. सकाळी ११ वाजेपासून भव्य रोगनिदान शिबिरास प्रारंभ होईल. या शिबिरात प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत दिवठाणे, डॉ. प्रसाद निकम, डॉ. राजेंद्र सवडतकर, डॉ. विनय अजगर, डॉ. अरुण गिर्हे, डॉ. पूजा धांडे हे आपली सेवा देणार आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित धांडे यांचेही सहकार्य लाभणार आहे. या शिबिरात मोफत नेत्रतपासणी, शस्त्रक्रिया, वैद्यकीय सल्ला आणि मोफत औषधी वाटप केली जाणार आहे. सायंकाळी ६ वाजता विवेकानंद आश्रमाचे गायकवृंद भक्तिगीत गायन सादर करणार असून, रात्री ८ वाजता हभप. निवृत्तीनाथ येवले शास्त्री यांचे प्रवचन पार पडणार आहे. रोगनिदान शिबिरासाठी येणार्या रुग्णांची सर्व सोय विवेकानंद आश्रमाच्यावतीने करण्यात येणार असल्याचेही सचिव संतोष गोरे यांनी सांगितले.
संत शुकदास माऊलींचे विवेकानंद आश्रमात संजीवन अस्तित्व
महानिर्वाण प्राप्त झालेले मानवहितकारी संत शुकदास महाराजश्रींचे आजही विवेकानंद आश्रमात संजीवन अस्तित्व असल्याची प्रचिती असंख्य भाविक-भक्तांना येत आहे. केवळ त्यांच्या समाधीदर्शनाने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असून, महाराजश्रींच्या संकल्पांची पूर्तता करण्यासाठी विवेकानंद आश्रमाचे व्यवस्थापन मंडळ अहोरात्र मेहनत घेत आहे. हरिहरतीर्थ व विवेकानंद स्मारक येथे उभारण्यात आलेली नितांत सुंदर उद्याने, जलपर्यटन, धार्मिक पर्यटनासाठी राज्यभरातून नागरिक हिवरा आश्रमकडे धाव घेत आहेत. सर्वोत्तम शिक्षण, आरोग्य, सेवा, कृषी व पर्यटनासाठी विवेकानंद आश्रम हे जागतिकस्तरावर विख्यात पावलेले आहे.
—————-