चिखली/मेहकर (तालुका प्रतिनिधी) – खोडसाळपणे म्हणा किंवा जळाऊ प्रवृत्तीतून म्हणा, सोयाबीनच्या सुड्या जाळण्याचा प्रकार सुरूच असून, चिखली तालुक्यातील पिंपळवाडी येथील अशोक बाबूराव गलाट यांची मिसाळवाडी शिवारातील शेतातील सोयाबीनची सुडी जाळण्यात आल्याने त्यांचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंढेरा पोलिस ठाणे हद्दीतील गावांत हे प्रकार सातत्याने घडत असल्याने ठाणेदारांनी तातडीने कारवाईची मागणी पुढे आली आहे. तसेच, मेहकर व शेगाव तालुक्यातदेखील शेतकर्यांच्या सोयाबीनच्या सुड्या जाळण्यात आल्या आहेत.
चिखली तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाणेअंतर्गत येणार्या पिंपळवाडी येथील शेतकरी अशोक बापूराव गालट यांची सोयाबीनची सुडी मंगळवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पेटून दिली. त्यामध्ये या शेतकर्याचे दीड ते दोन लाखाचे सोयाबीन जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व शेतकरी घटनास्थळी धावले, परंतु तोपर्यंत आगीचा मोठा भडका उडालेला होता. त्यामुळे सोयाबीन वाचविता आली नाही. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला असून, याबाबत अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुड्या जाळण्याचे प्रकार अंढेरा पोलिस ठाणेहद्दीत मोठ्या प्रमाणात होत आहेत. गलाट यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. दरम्यान, या घटनेचा तीव्र निषेध मिसाळवाडी, पिंपळवाडी येथील सरपंचांनी केलेला आहे.
मेहकर तालुक्यातील उकळी येथेही शेषराव विश्वनाथ बोरे यांची १७ ऑक्टोबरच्या रात्री शेतात सोंगणी करून ठेवलेली सोयाबीनची सुडी जाळण्यात आली. या सुडी शेजारी असलेले तुषार संच व इतर साहित्यदेखील जळून खाक झाले. त्यात बोरे यांचे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने या घटनेचा पंचनामा केला असून, मेहकर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, शेगाव तालुक्यातील गायगाव येथील शेतकरी सुदाम श्रीकृष्ण नागरे (३३) यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन सोंगणी करुन शेतातच सुडी लावली होती. १७ ऑक्टोबरच्या रात्री ७.३० वाजे दरम्यान सदर सोयाबीनची सुडी कुणीतरी पेटवून दिली. यामुळे सुदामा नागरे यांचे ४५ हजाराचे नुकसान झाले. याबाबत त्यांनी शेगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली असून त्यात त्यांनी शेजारी जानराव हरिभाऊ सोनोने व मंगेश जानराव सोनोने या पिता-पुत्रावर संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम ४३५, ३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेका राजेश गाडेकर हे करीत आहेत.
—————–