– शाळांचे खासगीकरण व नोकर्यांचे कंत्राटीकरण रद्द करण्याचीही मागणी
मेहकर/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे घाटावर असलेले प्रमुख पीक आहे. यावर्षी कमी पावसामुळे व येलो मोझेक या रोगामुळे सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये खूप घट झाली आहे. तर काही ठिकाणी अत्यंत अल्प असे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी लागवडीसाठी लावलेला पैसासुद्धा वसूल झाला नाही. या आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तेंव्हा शासनाकडून शेतकर्याला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी व दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने मेहकर येथे तीव्र निदर्शने करून मेहकर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारने अलीकडच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेशी निगडित असे दोन निर्णय घेतलेले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद करून त्या शाळा खासगी धनाढ्य व्यक्तींच्या संस्थेला देण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणारे गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, दीनदलितांच्या व अल्पसंख्यांकाच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण जाणार असून, या नवीन शाळेचा शिक्षणाचा खर्च ते उचलू शकणार नाही. तेव्हा पर्यायाने ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहतील. तसेच राज्य स्तरावर दुसरा निर्णय शासनाच्या नोकर्या देण्याबाबत आहे. सदर नोकर्या कंत्राटी पद्धतीने देण्यात असून, त्यामुळे बेरोजगार असलेल्या तरुणांची फार मोठी हानी होणार आहे. त्यांनासुद्धा सलग नोकरीच्या दृष्टीने दूर ठेवण्याचा प्रयत्न या निर्णयामुळे होणार आहे. तेव्हा हे दोन्ही आत्मघातकी निर्णय व सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानाशी खेळणारे निर्णय असल्याने ते त्वरित रद्द करावे, यासाठीसुद्धा मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार अजय पिंपरकर यांनी हे निवेदन स्वीकारले.
या निदर्शने व निवेदन देण्याच्या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते श्यामभाऊ उमाळकर, लक्ष्मणदादा घुमरे, अॅड. अनंतराव वानखेडे, रामभाऊ डहाके समन्वयक, दिगंबर मवाळ, देवानंद पवार, चित्रांगण खंडारे, नाजीमभाई कुरेशी, वसंतराव देशमुख, विलासराव चनखोरे, विनायकराव टाले, पंकज हजारी, प्रदीप देशमुख, शैलेश बावस्कर, कैलास सुखदाने, अनिल देशमुख, युनूस पटेल, भूषण काळे, अशोक इंगळे, सतीश ताजने, रवी सावजी, संजय मस्के, संजय वानखेडे, राजेश अंभोरे, डॉ. शेषराव बदर, अॅड. पाखरे, नारायण खोडवे, दिलीप आखरें, विनोद गोरे, आशुतोष तेलंग, श्रीधरराव लहाने, राजाभाऊ गायकवाड, शेरुभाई कुरेशी, सुखदेव ढाकरके, नारायण इंगळे, छोटू गवळी, रियाज कुरेशी, संदीप ढोरे, नितीन तुपे, तुकाराम चव्हाण इत्यादी पदाधिकार्यांनी यामध्ये सहभाग घेतला.