– प्रवाशाने सोशल मीडियातून आणला होता धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – नागपूरहून अमरावतीमार्गे पुण्याकडे जाणारी संगीतम ट्रॅव्हलच्या बसचालकाने समृद्धी महामार्गाने वाहन चालवताना मोबाईलवर व्हिडिओ पाहात असतानाची एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली होती. याप्रकरणी संबंधित बेजबाबदार चालकाविरुद्ध बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या बसचा परवाना जळगाव खान्देशचा असल्याने जळगाव ‘आरटीओ’ने ही ट्रॅव्हल्स जप्त केली आहे. परिवहन विभागाच्या या दणकेबाज कारवाईने समाधान व्यक्त केले जात असून, अपघात रोखण्यासाठी ही कारवाई महत्वपूर्ण मानली जात आहे.
सविस्तर असे, की संगीतम ट्रॅव्हलची (क्रमांक एम.एच. १९ सीएक्स ५५५२) बस नागपूरवरून अमरावतीमार्गे समृद्धी महामार्गाने पुण्याला जात होती. यावेळी ट्रॅव्हल्स चालक धनंजय कुमार रवींद्रनाथसिंह हा बसच्या डॅश बोर्डवर मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत बस चालवत होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओची दखल आरटीओकडून घेण्यात आली. बुलढाण्याचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्या आदेशाने सहायक मोटार वाहन निरीक्षक अनुजा काळमेघ यांनी खासगी बसच्या चालकाविरुद्ध मेहकर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिलसांनी चालक धनंजय कुमार रविंद्र नाथ सिंह मुंबई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला लवकरच अटक केली जाणार आहे. तसेच, जळगाव आरटीओंनी ही बसदेखील जप्त केल्याने या बसच्या मालकालादेखील चांगलाच दणका बसला आहे.
समृद्धी महामार्गावरील अनेक अपघात हे केवळ चालकांच्या चुकीमुळे झाले आहेत. तरीही खासगी बसचे चालक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. दिनांक १५ ऑक्टोबररोजी नागपूरहून अमरावतीमार्गे पुणे येथे निघालेल्या खागसी बस क्रमांक एमएच १९ सीएक्स ५५५२ चा चालक बस भरधाव असताना मोबाईलवर हेडफोन लावून व्हिडीओ पाहत होता. हा प्रकार बसमधील एका प्रवाशाने चित्रीत करून १६ ऑक्टोबररोजी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. ————–