Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPolitics
अजितदादा गटांचे १५ आमदार शरद पवारांकडे परतीच्या वाटेवर!
– पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक दोन्ही गट लढविणार नाहीत, चिन्ह व पक्षाचे नाव वाचविण्यासाठी निर्णय
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. दरम्यान, पक्षाचे अजित पवार गटात गेलेले १५ आमदार लवकरच स्व-गृही परत येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. तसेच, पक्षाचे नाव व चिन्ह गोठावले जाऊ नये म्हणून पक्षाच्या दोन्ही गटाने आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले, की त्यांच्या संपर्कात अजित पवार गटातील १५ आमदार आहेत. आज पक्षाकडून पुणे जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन भाषण केले. त्यावेळी त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले, की अजित पवार गटातील १५ आमदार हे आपल्या संपर्कात आहेत. त्यांची इच्छा आहे की, पुन्हा ते शरद पवार यांच्याकडे यावेत. पण त्यासंदर्भात अंतिम निर्णय हे शरद पवार घेणार आहेत. पक्ष आणि चिन्हासंदर्भात अजित पवार गटात गोंधळ आहे. त्यांना वाटल होते की, आपल्याला पक्ष आणि चिन्ह मिळून जाईल. पण तसे झाले नाही. आपल्या पक्षाचा खालचा कार्यकर्ता हा कुठेही गेला नाही. त्यामुळे याची दखल निवडणूक आयोगालादेखील घ्यावी लागली आहे.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवारांच्या गटाने आणखी एक मोठा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला आहे. दोन्ही गट आगामी पाच राज्यांच्या निवडणुका लढवणार नाहीत. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात लढाई सुरु असल्याने चिन्ह गोठवण्यात येऊ नये, या करिता हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून दावा सांगितला जात आहे. हे दोन्ही गट आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीलादेखील लागले होते. मात्र, येत्या ९ नोव्हेंबररोजी राष्ट्रवादीच्या चिन्हाची पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे चिन्हाबाबतचा पेच निर्माण झाला असता, त्यामुळे ही लढाई सुरु असताना दोन्ही गटांकडून संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
शिरूर आणि बारामती हे दोन्ही मतदारसंघ हे पुण्यातील आहे आणि या मतदारसंघात आपला खासदार हा निवडून आला आहे. आगामी काळात या मतदारसंघात आपल्याला खूप काम करायच आहे. सुप्रियाताईंच्या मतांच्या टक्क्यांत वाढ होईल, त्या अनुषंगाने कामाला लागा.
– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस