– ठाणेदार विकास पाटील यांनी अवघ्या १२ तासांत लावला खुनाचा छडा!
चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील चंदनपूर येथील अनंथा तुकाराम इंगळे यांच्या थ्रेशर मशीनवर कामासाठी व सोयाबीन काढण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगालमधील एका अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करण्यात आल्याचे काल उघडकीस आले होते. तर या घटनेनंतर या मुलीसोबत असलेले दोन तरूण पळून गेले होते. संशयित आरोपी असलेल्या या दोन तरूणांचा छडा लावून त्यांना चालत्या रेल्वेतून अवघ्या १२ तासांत जेरबंद करण्यात अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास पाटील व त्यांच्या टीमला यश आले आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेत की नाही, याचा अहवाल अद्याप येणे बाकी असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असावी, असा एक संशय पोलिसांना आहे.
चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे परप्रांतीय मुलीच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. त्या मुलीसोबत आलेले दोन तरुणसुद्धा घटनास्थलाहून पळून गेल्याने आरोपी तेच असू शकतात, असा संशय पोलिसांना आहे. अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विकास पाटील यांनी तपासाची पूर्ण सूत्रे आपल्या हाती घेऊन अवघ्या १२ तासाच्याआत पळून गेलेल्या या दोन तरूणांना वसई येथे चालत्या रेल्वेतून जेरबंद केले आहे. पकडण्यात आलेल्या या आरोपींची नावे रजत उर्फ राहुल वय वर्ष २२, छोटू वय वर्ष २५ अशी आहेत. ठाणेदार विकास पाटील, दुय्यम ठाणेदार गोरे, पोहेकॉ वैâलास उगले आदी कर्मचार्यांनी तपासकामी महत्वपूर्ण कामगिरी केली.
चंदनपूर येथील अनंथा इंगळे यांच्याकडे थ्रेशर मशीन आहे. सोयाबीनच्या हंगामात ते बाहेरून मजूर आणून काम करून घेतात. आतादेखील पुण्यातून त्यांनी चार मजूर आणले होते. त्यात दोन मुले व एक मुलगी सोबत होती. त्यांना राहण्यासाठी गावातच जुलालसिंग इंगळे यांचे मातीचे घर देण्यात आले होते. या तीनही मुलांना कपडे, खाण्याची सोय व काही पैसेही इंगळे यांनी दिले होते. परंतु, परवा रात्री बारा वाजेच्या सुमारास भागवत इंगळे यांना घरात मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब गावातील पोलिस पाटील, सरपंच यांना सांगितली. तसेच, अंढेरा पोलिसांनाही कळवली. ठाणेदार विकास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने तपास हाती घेतला. ज्या दुकानातून कपडे घेतले होते त्या राजवैभव कापड केंद्र व चिंतामणी कापड केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या मुलांचे व्हिडिओ चित्रीकरण मिळाले. त्याआधारे फोटो तयार करून पळून गेलेल्या दोघांचा शोध घेण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारे ते रेल्वेने प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाल्याने वसई रेल्वेस्थानकावरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचा अंढेरा पोलिसांनी ताबा घेतला असून, त्यांच्या चौकशीतून या खुनाचे नेमके कारण उघड होणार आहे. तसेच, वैद्यकीय तपासणीत या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेत की नाही, हेही उघड होणार आहे.
————-