BULDHANAChikhaliCrimeHead linesVidharbha

सोयाबीन सोंगणीसाठी आलेल्या परप्रांतीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या

– मृत युवती पश्चिम बंगालमधील, चाेवीस तासात आराेपी जेरबंद

चिखली (कैलास आंधळे) – सोयाबीन सोंगणीसाठी आलेल्या परप्रांतीय मजूर युवतीची चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे हत्या झाल्याची थरारक घटना १३ ऑक्टोबररोजी रात्री घडली. या युवतीबरोबर आलेले दोन परप्रांतीय युवक पसार झाले होते परंतु अंढेरा पाेलिसांनी माेठ्या शिताफीने चाेवीस तासाच्याआत आराेपी जेरबंद केले आहेत. सध्या सोयाबीन सोगणे व सोयाबीन काढणीचा सीजन चालू असल्याने अनेक परप्रांतीय कामानिमित्त अनेक खेडेगावात आलेले आहे. चंदनपूरमध्येसुद्धा असेच एक युवती व दोन युवक कामानिमित्त १३ ऑक्टोंबररोजी गावात आले होते. त्यांची राहण्याची सोय एका घरामध्ये केली गेली होती. शेतीपंपाची मोटर चालू करण्यासाठी शेतात जाण्यासाठी निघालेल्या शेतकर्‍याला त्या घराचा दरवाजा ११ ते १२ वाजेच्या सुमारास उघडा असल्याचे आढळल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे तिघेही मजूर पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

हत्या झालेली ही परप्रांतीय युवती १६ वर्षाची असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित शेतकर्‍याने घरामध्ये जाऊन बघितले असता त्या ठिकाणी फक्त ती युवतीच जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी ही बाब सरपंच व गावातील इतर व्यक्तींना सांगितल्याने त्यांनी ह्या घटनेची माहिती अंढेरा पोलीस स्टेशनला दिली. घटनेचे गांभीर्य पाहता अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील व पोलीस कर्मचारी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. घटनेच्या ठिकाणी १६ ते १७ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला, व त्या युवती सोबत असलेले दोन तरुण रात्रीच फरार झाल्याचे समोर आले. या आराेपींचा तांत्रिक सहाय्याने तपास घेतला असता ते रेल्वेने प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्रीच वसई रेल्वे स्थानकातून या दाेघा आराेपींना अंढेरा पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना अंढेरा येथे आणण्यात आले असून, पाेलिस त्यांची कसून चाैकशी करत आहेत.

दरम्यान, या युवतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता चिखली ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला का, याची तपासणीही केली जाणार आहे. या युवतीवर सामूहिक बलात्कार झाला असावा, असा एक संशय असून, तिने विरोध केल्याने तिचा गळा दाबून तिचा खून केला असावा, असा संशय वर्तविला जात आहे. अंढेरा पोलिस त्या अनुषंगाने अधिक तपास करत आहे. 

ठाणेदार विकास पाटील यांनी सूत्रे हाती घेऊन रात्रीच त्या दोन फरार युवकांचा शोध घेतला असता ते युवक कुठेच आढळून आले नाही. काल, १४ ऑक्टोंबर रोजी सकाळीच अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील व त्यांचे कर्मचारी, देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील चंदनपूर येथे घटनास्थळी ठाण मांडून होते. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमचे तज्ञ व श्वान पथक सुद्धा बोलवण्यात आले होते. अंढेरा पोलिस अधिक तपास करत आहेत.


पोलिसांच्या माहितीनुसार, चंदनपूर येथील एक युवक पुणे येथे एका बांधकाम साइटवर सुपरवायझर म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी हे दोन तरुण व एक युवती मजूर म्हणून काम करत होते. ते तिघेसुद्धा दुसर्‍या कामाच्या शोधात असताना त्या युवकाने गावाकडे काम बघत, त्या तिघांना चंदनपुराला पाठवले होते. रात्रीच त्या युवतीची हत्या झाल्याने चंदनपूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तिघांच्या अंगावर कपडे नसल्याने ज्या शेतकर्याकडे ते कामाला आले हाेते, त्या इंगळे यांनी त्यांना कपडेलत्ते घेऊन राहायला घरही दिले हाेते. एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे पळून गेलेले आराेपी जेरबंद करण्यात ठाणेदार विकास पाटील यांच्या पथकाला यश आले आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!