एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, किंवा मराठ्यांची विजय यात्रा निघेल!
– मराठा समाज एकवटला, अंतरवली सराटीत मराठा एकीचे अतिविराट दर्शन!
अंतरवली सराटी, जि. जालना (विशेष प्रतिनिधी) – प्रचंड शिकलेला असतानाही आज मराठा समाज अडचणीत आला आहे. एक टक्का कमी मिळाला तरी नोकरी मिळत नाही. म्हणून ही सामान्य मराठ्यांची लढाई असून, ही लढाई आम्हाला जिंकायची आहे. आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला मात्र दहा दिवसांनंतर आरक्षण पाहिजे. कारण, आरक्षण आमच्या हक्काचे आहे. एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांची विजययात्रा निघेल, अशा शब्दांत मराठा योद्धे मनोज जरांगे पाटलांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावत सूचक इशारा दिला.
ज्या अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांसह ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला होता, त्याच गावात मराठा एकीचे आज अतिविराट दर्शन घडले. तब्बल लाखोंच्या संख्येने मराठा समाज या छोट्याशा गावात आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला होता. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी घणाघाती भाषण करत राज्य सरकारने आरक्षण द्यावे, असे नीक्षून सांगितले. संपूर्ण जगाला आणि देशाला मराठा समाज शांततेचा संदेश देणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज आज येथे आला आहे. मराठा समाज जसा शांततेत येथे आला तसाच शांततेत जाईलही. पण, आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला मात्र दहा दिवसांनंतर आरक्षण पाहिजे. कारण, आरक्षण आमच्या हक्काचे आहे. या समाजाच्या वेदना आहेत, ही सभा नाही. ही स्वतःच्या लेकरांची वेदना आहे. प्रचंड पैसा खर्च करूनही आज समाजातील मुलं बेरोजगार म्हणून जगत आहेत. जर १० दिवसात आरक्षण मिळालेले नाही तर पुढेही आंदोलन शांततेतच होणार पण पुढील आंदोलनाची दिशा २२ ऑक्टोबरला ठरवणार आणि पुन्हा एकदा शांततेत आंदोलन करत असताना आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटलांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आमची भावना जर सरकारला समजत नसेल तर त्यांनी काय समजावं. आंदोलन शांततेत होणार त्यात काही बदल होणार नाही. पण, सरकारला आरक्षण द्यावचं लागेल. येत्या दहा दिवसात सरकारने आरक्षण दिलं नाही तरी शांततेचा भंग होणार नाही. आरक्षण दिलं नाही तर पुढील भूमिका ठरवू. मराठा समाज शांत आहे. मायबाप समाजावर माझा विश्वास आहे. शांततेत आंदोलन केलं म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचलो. आम्ही काहीही झालं तरी आरक्षण घेणार हे ठामपणे सांगतो आहे. सध्या शिंदे समिती मराठवाड्यात फिरत आहे. सरकारचे म्हणणे आहे की पाच हजार पुरावे पुरेसे नाहीत. माझे त्यांना विचारणे आहे की तुम्हाला काय ट्रकभर पुरावे हवेत का? एक पुरावा सापडला तरीही पुरावा. आयोग किंवा समिती स्थापन केली तर ते तरी पाच हजार पानांचा अहवाल देतात का?, असा सवाल जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विचारला.
जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आज राज्याच्या कानाकोपर्यातून मराठा समाज आला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रमाता जिजाऊ माता की जय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो.. अशा घोषणांनी संपूर्ण सभास्थळ दुमदुमून गेले होते. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी जरांगे पाटलांनी व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना खाली पाठवले आणि सर्वांना सारखा न्याय असे ठणकावून सांगितले. हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवरायांना वंदन करुन आणि उपस्थितांना प्रणाम करुन मनोज जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली. मराठा समाज एक होत नाही, असे बोलणार्यांच्या आज एकत्र जमून मराठ्यांनी मुस्काटात हाणली, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला. १०० एकरच्या शेतात मनोज जरांगे पाटलांची सभा पार पडली. शुक्रवारी रात्रीपासूनच सभास्थळी मराठा आंदोलकांनी हजेरी लावली होती. सभेचे शेत गर्दीने गजबजून गेले होते.
मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या
– मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
– कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी.
– मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी.
– दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या.
– पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे.
मनोज जरांगे म्हणाले, “सध्या मराठा समाजाला भडकावण्याचा आणि हिंसा घडवून आणण्याचा डाव आखला जात आहे. असं झालं तर तुम्ही धिंगाणा घातला म्हणून आम्ही आरक्षण दिलं नाही म्हणतील. बेट्याहो हे मराठे आहेत, सगळ्यांच्या पुढे आहेत, तुम्ही येडे आहात का. आमच्या नादी लागणं इतकं सोपं समजू नका. तुम्ही आमच्या नादी लागायला कोणत्या झाडाचा पाला आहात.”
“मराठा पायाखाली मुंगीही मरू देत नाही”
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “मराठ्यांनी त्यांना मोठं केलं, त्यांची शान वाढवली. आपलं ठरलं आहे की, ४० दिवस काहीच बोलायचं नाही. आपण शांततेत कार्यक्रम करायचं ठरलं आहे. मराठ्यांनी शब्द दिला. मराठ्यांनी देशाला आणि जगाला भयानक संदेश दिला आहे. कोट्यावधीच्या संख्येने जमलेला मराठा पायाखाली मुंगीही मरू देत नाही.”