BuldanaBULDHANAVidharbha

भविष्यातील बाजारपेठेचा वेध घेत महिलांनी नव्या संकल्पना मांडाव्यात!

चिखली/ बुलढाणा (संजय निकाळजे) – बचतगटांच्या महिलांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य, गुणवत्ता आहे. मेहनत करण्याची तयारी आणि जीद्द आहे. भविष्यातील बाजारपेठेचा वेध घेत महिलांनी आता नव्या संकल्पना मांडाव्यात. त्यासाठी आवश्यक ते पाठबळ देण्यासाठी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनचा सदैव पुढाकार राहील, असे अभिवचन संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी दिले. दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने येथील शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. मोठ्या संख्येने बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या.

पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनसोबत जिल्ह्यातील १४०० बचतगट संलग्न आहेत. या बचतगटांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, जाहिरात, अर्थसहाय्य, बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम करण्यात येते. बचतगटांच्या महिलांनी उत्तम व्यवसाय निवडून उन्नती साधावी. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. उत्पादनांची दर्जेदार गुणवत्ता असल्याशिवाय योग्य बाजारपेठ मिळणार नाही. पारंपरिक उत्पादनांपेक्षा नवे काय करता येईल. याबाबत विचार करण्याची वेळ आहे. त्यामुळे येणार्‍या काळात या गोष्टीचा विचार करुन मार्गक्रमण करावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी जागृती महिला बचत गट, कृत्तिका महिला बचत गट, श्री गणेश महिला बचत गट, साई बाबा महिला बचत गट, प्रतिक महिला बचत गट, जय मल्हार बचत गट, ओम शिव साई महिला बचत गट, सावित्री महिला बचत गट, स्वरांजली महिला बचतगटांना रेकॉर्ड वाटप करण्यात आले.


गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप!

महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. चिखली येथील शिवाजी विद्यालयाच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याबद्दल या खेळाडूंचा जयश्रीताई शेळके यांनी सत्कार केला. गुणवंत खेळाडूंचे कौतुक केले. सत्कारमूर्तीमध्ये कोमल वाघमारे, दीक्षा वाघमारे, श्रुती पैठणकर, समृद्धी चाकोते, साक्षी बोंडे, रश्मी राठोड, श्रेया तायडे, अनया गेंदे, ऋतुजा खेडेकर या गुणवंत खेळाडूंचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!