BuldanaChikhaliHead linesVidharbha

अवैध रेती उत्खननातील वादग्रस्त तहसीलदारांना सक्तीच्या रजेवर पाठवणार, दोषी अधिकार्‍यांवर निश्चित कारवाई होणार!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – अवैध रेतीउत्खननास जबाबदार असलेल्या तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे, व विभागीय आयुक्तांच्या आदेशाची अमलबजावणी करून घेण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार प्रतापराव जाधव व माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी दिल्याने तब्बल दहाव्या दिवशी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते व विकास गवई यांनी आपले उपोषण सोडले. गौणखनिज चोरी प्रकरणात अनेक अधिकारी अडकले असल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर आहे. त्याला थोडा वेळ लागत असल्याने खासदारांच्या सूचनेवरून आपण तूर्त उपोषण मागे घेत आहोत, असे अनिल चित्ते यांनी सांगितले.

अवैध रेतीउत्खननाला जबाबदार असलेल्या तहसीलदार व संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते व विकास गवई यांनी २ ऑक्टोंबरपासून संत चोखासागर धरणामधील पाण्यातील बेटावर आमरण उपोषण सुरू केले होते. विभागीय आयुक्त यांनी नेमलेल्या चौकशी समितीकडून जो अहवाल प्राप्त झाला, त्या अहवालाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी संबंधित अप्पर जिल्हा अधिकारी बुलढाणा, गौणखनिज अधिकारी बुलढाणा, विभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली होती. तसेच, विनाविलंब कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले होते. तसेच तहसीलदार श्याम धनमने यांच्यासह नायब तहसीलदार विकास राणे, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कारवाईस्तव प्रस्ताव मागितले होते. परंतु संबंधितावर कारवाईस विलंब होत असल्यामुळे अनिल चित्ते व विकास गवई यांनी दहा दिवसांपूर्वी उपोषण सुरू केले होते. त्यांची तब्येत खालावत चालली होती. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, या ठाम भूमिकेवर हे दोन्ही उपोषणकर्ते होते. परंतु संबंधितावर कारवाईस मंत्रालयातील कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे खासदार प्रतापराव जाधव तसेच माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी उपोषणकर्त्यांना पुढील कारवाईसाठी पाठपुरावा करून संबंधितावर ठोस कारवाई करण्याचे तसेच कारवाई होईपर्यंत तहसीलदार धनमाने यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे जिल्हा अधिकार्‍यांना फोनवर बोलून आश्वासन देऊन उपोषण सोडले.
तसेच उपोषणस्थळी उपस्थित असलेले अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना भविष्यात अवैध रेती उत्खनन होणार नाही, तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या धोरणानुसार रेती डेपो सुरू करून रेती उपलब्ध करून देण्याचे तसेच घरकुल योजनेसाठी पाच ब्रास फुकट रेती उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच टाकरखेड भागिले येथील अवैध रेती उत्खनन करणार्‍या टिप्परच्या धडकेत मृत्युमुखी पडलेले स्वर्गवासी समाधान भागिले यांचा तेरा वर्षाचा मुलगा यश यानेसुद्धा आपल्या व्यथा एका निवेदनात मांडून खासदार जाधव यांना निवेदन दिले व संबंधितावर कारवाई करण्याची विनंती केली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना पदाधिकारी बाबुराव मोरे, दीपक बोरकर, गजेंद्र देशमुख, शिंपणे साहेब, विजुभाऊ उपाध्ये, पूजाताई खांडेभराड, संदीप मगर, अमोल काकड, सुभाष सवडे, प्रभाकर खांडेभराड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच परिसरातील सरपंचांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!