तहसीलदार श्याम धनमनेंना तात्काळ निलंबित करा; अनिल चित्ते यांचे संत चोखासागरात उपोषण
सिंदखेडराजा/देऊळगावराजा (अनिल दराडे) – देऊळगावराजा तालुक्यातील अवैध रेती उत्खननास जबाबदार असलेले तहसीलदार श्याम धनमने यांच्या अनागोंदी कारभारामुळे रेतीचे उत्खनन व वाहतूक करणार्या ओव्हरलोड टिप्परमुळे अनेकांचा बळी गेला आहे. बर्याच जणांना अपंगत्व आले आहे. त्यातच शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. तहसीलदार धनमने यांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल चित्ते व विकास गवई यांनी संत चोखामेळा धरणाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाकडे जिल्हाधिकारी यांनी अद्याप लक्ष न दिल्याने पंचक्रोशीतील गावांत तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.
विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी अहवालानुसार विभागीय आयुक्तांनी संबंधित तहसीलदार शाम धनमने यांच्यावर दिलेल्या कारवाईच्या आदेशानुसार संबंधित अधिकारी, कर्मचार्यांवर महिना उलटूनसुद्धा कारवाई झाली नाही. तसेच आजरोजी खडकपूर्णा धरणातून तसेच नदीपात्रातून राजेरोसपणे बोटी, जेसीबी, टिप्परद्वारे वाळू उपसा सुरू आहे. यामुळे नदीकाठीवरील गावांतर्गत रस्ते खराब झाले आहेत. तसेच बाजारपेठेकडे जाणारे रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. खडकपूर्णा नदीच्या परिसरातील सगळ्याच गावांतील शाळेमधील विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांचे आर्थिक, मानसिक नुकसान झाले आहे. याबाबत परिसरातील सरपंच, ग्रामस्थांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. आर्थिक लालसेपोटी झोपेचे सोंग घेतलेले तहसीलदार व त्यांचे कर्मचारी जागे व्हायला तयार नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांनी संबंधित विभागाला पुराव्यासह तक्रारी सादर केल्या होत्या. विभागीय आयुक्त तसेच उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानुसार तत्कालीन आयुक्तांनी चौकशी करून दोषी तीन तलाठी, एक मंडळ अधिकार्यांना निलंबित करून थातुरमातूर कारवाई झाली होती. दरम्यान, रेती उत्खनन सुरुच असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनिल चित्ते यांनी तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांचा पाठपुरावा माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी अमरावतीचे विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. विभागीय आयुक्तांनी उपायुक्त यांच्याकडे चौकशी सोपावली होती. चौकशीत दोषी आढळूनही काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई व गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी चोखा प्रकल्पाच्या मध्यभागी आजपासून अनिल चित्ते यांनी मेहुणाराजा शिवारात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यांतील उपोषणांकडे जिल्हा प्रशासनाचा कानाडोळा!
देऊळगाव मही येथे महामार्गानजीक असलेल्या राम मंदिराजवळ आपल्या शोषित व पीडित जनतेसाठी उपोषणाला देऊळगावमही येथील रामदास पाटीलबा शिंगणे व शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रामेश्वर वायाळ यांनी पक्षाच्यावतीने एकूण ११ मागण्यांसाठी निवेदन शासनाला दिले. मलकापूर सोलापूर महामार्गावरील देऊळगाव मही येथील ३०० मीटर अंतरात वाहने हळू चालवा, सर्वच शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण न करता जमीन भूसंपादन करून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा, तसेच राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करावे, अपघात होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना विश्वासात मूळ जुना रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी रामदास पाटीलबा शिंगणे व शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस रामेश्वर वायाळ हे उपोषण करीत आहेत.
आतापर्यंत या उपोषणाला माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक प्रा. सदानंद माळी, तोताराम कायंदे, विनोद वाघ, नरेंद्र खेडेकर, धनशिराम शिंपणे, संतोष भुतेकर यांनी भेटी दिल्या असून प्रशासनाकडून मात्र हे उपोषणे पूर्णपणे दुर्लक्षित आहे. तसेच, सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या विविध शासकीय व शेती उपयुक्त साहित्य सामग्री व इतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनामध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशी व कारवाईच्या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील शासकीय योजनेतील गैरव्यवहाराच्या विरोधात चंद्रकांत खरात हे उपोषण करत आहेत, मात्र याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी यांचे उपोषणाकडे अक्षम्य दुर्लक्ष?
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नुकतेच किरण पाटील हे रुजू झाले असून, बुलढाणा जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतूक ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. महसूलच्या पदाधिकारी यांच्यावर अवैध रेतीमाफियाकडून जीवघेणे हल्ले होत असल्याने त्यांनी वेळीच अॅक्शनमोडवर येत अनेक मिंटिंगाचा सपाटा लावला आहे. यापुढे महसूलचे पदाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना देत पोलिस संरक्षणात कारवाई केली जाईल. तसेच शस्त्रधारी पोलिस कर्मचारी यापुढे पुरवण्यात येणार असून, यापुढे उत्खननात अनेक वेळा सहभागी असल्यास मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला होता. दुसरीकडे विभागीय आयुक्तांच्या अहवालात दोषी असलेले तहसीलदार श्याम धनमने यांच्यावर कारवाईसाठी २ ऑक्टोबर २०२३ पासून संत चोखासागरात अनिल चित्ते यांनी विकास गवई यांच्यासोबत उपोषण सुरू केले असून, जिल्हाधिकारी यांचे उपोषणाकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. याबाबत जिल्हाधिकारी यांना फोन केला असता, त्यांनी फोन न उचलण्यातच धन्यता मानली.