सरकार बदलले; मंजूर कामे करावीत की नाही?
– अधिकारी व ठेकेदार पडले बुचकळ्यात!
– कोट्यवधींची विकासकामे जिल्हाभर ठप्प
मेरा बु , ता. चिखली (प्रताप मोरे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात करोडो रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत. त्यामध्ये काही कामे चालू आहेत तर काही कामे सुरू करायची अधिकारी व ठेकेदारामध्ये धावपळ सुरू होती. मात्र अचानक सरकार बदलले आणि शिंदे सरकार सत्तारूढ झाले आणि, मागील सरकारची कामे त्यांनी थांबवली. त्यामुळे मंजूर झालेली कामे करावी की नाही, अशा पेचात अधिकारी व ठेकेदार सापडले आहेत.
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना इतर पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि उध्वव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला. या महाविकास आघाडी सरकारमध्ये सिंदखेडराजा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना अन्न औषध प्रशासन मंत्री पद देवून बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री बनविले. त्यामुळे डॉ. शिंगणे यांच्याकडे मंत्रीपद आल्याने त्यांनी मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात करोडो रुपयांची कामे मंजूर करून आणली आणि मंजूर विविध विकासकामे गावागावात कार्यकर्त्यांच्या तथा गावकर्यांच्या माध्यमातून वाटप केली. ही कामे घेण्यासाठी ठेकेदार एकमेकांत चढाओढ करीत होते. अनेक ठेकेदारानी हजारो रुपये भरणा करुन कामे घेतली असून, काही कामांचे अनेक ठिकाणी लोकार्पण, उदघाटन झाले होते. मात्र अचानक शिवसेना पक्षात बंडखोरी झाली आणि महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यामुळे एकमेकांचा विरोध करुन शिंदे सरकारने अगोदरच्या सरकारने मंजूर केलेल्या कामावर बंदी घातली. अनेक कामे थांबल्याने ठेकेदार व अधिकारी बुचकळ्यात सापडले आहेत. मंजूर कामे करावी की नाही, कामे सुरू केल्यास मोठा आर्थिक भुर्दंड पडू शकतो व ठेकेदाराचे दिवाळे निघू शकते, अशा परिस्थितीमुळे अनेक राष्ट्रवादीच्या ठेकेदारांनी घेतलेली कामे थाबविली असल्याचे पाहायला मिळत आहे.