BULDHANAHead linesVidharbha

भरधाव कंटेनरच्या चालकाला डुलकी; महावितरणचे तीन खांब मोडले; वीजतारा तुटून रस्त्यावर, सुदैवाने जीवितहानी टळली!

– महावितरणचे पाच लाखांचे नुकसान, पोलिसांत गुन्हा दाखल

सिंदखेडराजा/देऊळगावराजा (अनिल दराडे) – मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव जाणार्‍या कंटेनरच्या चालकाला डुलकी लागल्याने या कंटेनरने महावितरणच्या तीन विद्युतवाहक खांबांना धडका दिल्यात. या धडकांनी हे खांब मध्यभागातून वाकले असून, वीजतारा तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. सुदैवाने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर वर्दळ नसल्याने जीवितहानी झाली नाही. तथापि, महावितरणचे पाच लाखाच्या सुमारास नुकसान झाले असून, देऊळगावराजा पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देऊळगावराजा शहरातील बसस्थानक ते चिखली रोडवर ही भीषण घटना घडली होती.

सविस्तर असे, की देऊळगावराजा शहरातील बसस्थानकाकडून चिखलीकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यांना खूप रहदारी असते आणि वर्दळ पहावयास मिळते. अहिंसा मार्ग ते बालाजी वेसच्या दरम्यान तीन विद्युत खांबावरून त्या भागामध्ये विद्युत पुरवठा केलेला आहे. काल रात्रीला एक ते दीड वाजेच्या सुमारास बसस्थानकाकडून चिखलीकडे जाणार्‍या पार्सल वाहक भरधाव कंटेनरने (क्रमांक आरजे १४ डीक्यू २४४१) बुलडाणा अर्बनजवळील विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. त्यामुळे पोस्ट ऑफिस समोरील एक खांब व बालाजी वेशीवरील एक खांब असे एकूण तीन खांब पूर्णपणे वाकले. तीनही खांबावरच्या तार पूर्णपणे रस्त्यावर तुटून पडल्या. सदरहू घटना ड्रायव्हरला डुलकी आल्यामुळे घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनेची माहिती बुलढाणा अर्बनचे वॉचमन यांनी तात्काळ महावितरणाला दिली. महावितरणाने कोणतीही जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. साधारणता: महावितरणाचे चार ते पाच लाख रुपयाची नुकसान झाल्याचे समजते. रात्रीची वेळ असल्यामुळे फार मोठा अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!