लोणार (उद्धव आटोळे) – इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस जश्ने ईद मिलादुन्नबी उर्दू महिन्याच्या १२ तारखेला म्हणजे २८ सप्टेंबररोजी साजरा करण्यात आला. या निमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो मुस्लीमबांधव सहभागी झाले होते. यानिमित्ताने हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले. शहरात जश्ने ईद मिलादुन्नबी व गणपती विसर्जन हे दोन्हीही सण शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सजवलेल्या गाड्या, हिरव्या पताका, शुभेच्छा फलक घेऊन आबालवृद्धांसह शहरातील विविध परिसरातील मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी होते. डोक्यावर पगडी, सदा अशा पारंपरिक वेशात सहभागी मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली. या वेळी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लाल्लाहू सल्लाम पैगंबर यांच्या जीवनावर माहिती देण्यात आली. जुलूस-ए- मोहंमदी सकाळी ९.०० वाजता स्थनिक जामा मशीद चौक येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. येथून मुख्य मार्गाने पोलीस स्टेशन, साबणपुरा, येथून कब्रस्तान येथील ईदगाह येथे मौलाना अलहाज मोहम्मद रफीऊद्दीन अशरफी साहब किबला, परभणी व शहरातील सर्व मजीद मधील मौलाना यांनी प्रवचन करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी हा उद्देश असल्याचे सांगितले. मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, पताके, झेंडे लावून सजावट करण्यात आली होती.
मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्यांसाठी सामाजिक संघटना कार्यकर्त्यांकडून अल्पोहार पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीत आझाद नगर, रोशन पुरा, गुलाबखां मोहल्ला, नवी नगरी, जमजम कॉलोनी, कुरेशी नगर, घरकुल, इंदिरानगर, गवळीपुरा या भागातील मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता व शांततेच्या मार्गाने मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी ठाणेदार निमीश मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे, पीएसआय राजाभाऊ घोगरे, पीएसआय गोपाळ राठोड, पीएसआय सागर इंगळे, गोपनीय विभागाचेच संतोष चव्हाण, विठ्ठल चव्हाण, टाऊनचे संजय जाधव, संतोष चव्हाण, पो.का. गणेश लोंढे, ट्रॅफिकचे पंढरी गीते, मनोज शेजुळ, व त्यांच्या सहकार्यांनी कोणती अनुसूचित घटना घडू नये, यासाठीच चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी लोणार शहरातील मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते.