मंजूर असलेल्या पाणंद रस्त्याचे काम रखडले; लालफिती कारभार सुधारा नसता तीव्र आंदोलन छेडू!
– जिल्हा संघटक डॉ.गोपाल बच्छिरे यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन
लोणार (उद्धव आटोळे) – लालफिती कारभार सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा खणखणीत इशारा तहसीलदार लोणार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना आज (दि.२७) शिवसेना (ठाकरे) जिल्हा संघटक डॉ.गोपाल बच्छिरे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
सविस्तर असे, की मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदण रस्ते योजने अंतर्गत २३ डिसेंबर २०२२ रोजी योजना विभाग मंत्रालय मुंबईकडून शासन निर्णयानुसार निर्णयाच्या पान क्रमांक तीनवर व अनुक्रमांक ३४ नुसार लोणार ते वेणी पांदण दोन किलोमीटरचा रस्ता दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी शासनाने मंजूर केलेला आहे. शासनाच्या परिशिष्ट अ च्या अटी शर्तीनुसार, शेत पांदण रस्त्याचा महसूल विभागाच्या संबंधित गाव नकाशामध्ये रस्ता अस्तित्वात आहे, सदरील रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने ना हरकत ठराव केलेला आहे, सदरील रस्ता हा इंग्रज काळापासून आहे, यात कोणाचीही वैयक्तिक मालमत्तेस हानी पोहोचत नाही. या पांदण रस्त्यासाठी भूसंपादनाची गरज नाही, सदरील पांदण रस्त्याविषयी कोणतीही न्यायालयीन वाद नाही, सदरील पांदण रस्ता हा केवळ मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदण रस्ते योजने अंतर्गतच मंजूर आहे, या सर्व बाबी सुस्पष्ट असताना नऊ महिने होऊन गेले या शासन निर्णयास परंतु महसूल विभागाच्या लालफिती कारभारामुळे सदरील रस्त्याचे काम रखडलेले आहे. सदरील लोणार ते वेणी दोन किलोमीटर पांदण रस्त्याचे काम येत्या आठ दिवसात सुरु न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडूत, या दरम्यान कायदे व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास यास सर्वस्व आपण जबाबदार असाल याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी, असा सज्जड दम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बुलढाणा जिल्हा संघटक डॉ.गोपाल बच्छिरे यांनी शेकडो शिवसैनिकांसमवेत दिला आहे.
यावेळी डॉ.गोपाल बछिरे जिल्हा संघटक, अॅड. दीपक मापारी तालुका प्रमुख, गजानन जाधव सर शहर प्रमुख, कैलास अंभोरे, श्रीकांत नागरे, परमेश्वर दहातोंडे, तेजराव घायाळ, शाम राऊत, सुदन अंभोरे, गोपाल मापारी, लुकमान कुरेशी, उमर सय्यद, इकबाल कुरेशी, प्रसेनजित बछिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.