चिखली (कैलास आंधळे) – मेरा बुद्रूक फाटा चौकातील उघडा व जीवघेण्या अपघाताला निमंत्रण ठरणारा महावितरणचा फेजबॉक्स अखेर महावितरण कंपनीने हटविला असून, याबाबत ब्रेकिंग महाराष्ट्रने सडेतोड वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेऊन कनिष्ठ अभियंता आदित्य पडघान यांनी ही कारवाई केली आहे. याबद्दल ग्रामस्थांनी ब्रेकिंग महाराष्ट्रसह पडघान साहेब यांची आभार व्यक्त केले आहेत.
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द स्टेशन अंतर्गत येणार्या मेरा बुद्रूक फाटा चौकातील महावितरण कंपनीची गावठाण डीपी भरचौकाच्या बाजूला असल्याने त्या गावठाण डीपीचा फेज बॉक्स २० ते २५ महिन्यापासून जळालेल्या अवस्थेत व डीपीतून विद्युत प्रवाह चालू असलेल्या वायरला चपलीची पाचर लावलेल्या अवस्थेत उघडा असल्याने त्या ठिकाणावरून येणार्या जाणार्या ग्रामस्थांसाठी धोकादायक बनला होता. येथून जाणार्या येणार्या लोकांची संख्या जास्त असल्याने व त्यामध्ये शाळकरी मुले-मुली, वयोवृद्ध मंडळी यांची नेहमी वर्दळ असल्याने डीपीवरील हा उघडा व धोकादायक फेज बॉक्स एखाद्या दुर्देवी घटनेला निमंत्रण ठरत होता. याबाबतचे प्रखड वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रकाशित करताच, महावितरण कंपनीचे मेरा खुर्द स्टेशनचे कनिष्ठ अभियंता आदित्य पडघान यांनी या बातमीची तातडीने दखल घेऊन त्या ठिकाणी नवीन फेज बॉक्स व नवीन वायर बसून दिल्याने त्या ठिकाणावरून येणार्या जाणार्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला व ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे आभार मानले. नवीन फेज बॉक्स बसवतेवेळी महावितरणचे कर्मचारी श्रीकृष्ण खेडेकर, विजय भगत, विष्णू लहाने, कैलास माळेकर गावातील पांडुरंग चेके, सुधाकर कुमठे आदींनी परिश्रम घेतले.