Breaking newsHead linesNagpurVidharbha

नागपुरात हाहाकार, विदर्भात जोरदार पाऊस!

नागपुरात मदत व बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण; राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी!

नागपूर/पुणे (विशेष प्रतिनिधी) – राज्यात गुरूवारपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नागपुरात तर पावसाने हाहाकार उडविला आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शहरात पाणी घुसले असून, त्यात एकजण वाहून गेला आहे. सरकारने तातडीने भारतीय लष्कराला पाचारण केले असून, ्स्थानिक यंत्रणा व लष्कराच्या मदतीने आतापर्यंत ५०० जणांचे सुरक्षीत स्थलांतर करण्यात आले होते. शहरात सद्या पूरसदृश स्थिती आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफचे जवान मदत व बचावकार्य करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हवामान खात्याने आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून, विदर्भात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू होता. तसेच, राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.

नागपुराला काल रात्रीपासून पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. रौद्ररुप धारण केल्याने संपूर्ण शहर पाण्याखाली गेले असून, पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरफ, सैन्यदल आणि एसडीआरएफचे पथक रेस्क्यू करत आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. हवामानतज्ज्ञ शिल्पा आपटे म्हणाल्या की, ‘उद्यापासून पुढील तीन दिवस विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच राज्यात मॉन्सून अतिसक्रिय असल्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर उद्यापासून २९ सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी राहील, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या हवामानतज्ज्ञांनी दिली आहे. हवामाने विभागाने मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच याबरोबर सोमवारपासून २५ सप्टेंबर भारतातून परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.


नागपूरच्या काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं, तिथलं जनजीवन विस्कळीत झालं. उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनानं एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनानं मदतकार्य हाती घेतलं आणि दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली. पाणी साचलेल्या भागातल्या 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या पावसात दोन महिलांचा मृत्यू झाला आणि १४ जनावरं दगावली आहेत.

https://twitter.com/i/status/1705475885665784119

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!