चिखलीत शासकीय वसतीगृहातील मुलींना अन्नातून विषबाधा; पाचजणींची प्रकृती चिंताजनक!
– प्रकृती खालावल्यानंतर चिखलीतील खासगी रूग्णालयात रात्री दोन वाजता भरती केले!
चिखली (कैलास आंधळे/महेंद्र हिवाळे) – चिखली येथील राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, त्यापैकी पाच मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. या मुलींना मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या वसतीगृहातील मुलींना अतिशय निकृष्टदर्जाचे अन्न दिले जात असल्याचे धक्कादायक वास्तव असून, वसतीगृह अधीक्षिकेवर तातडीने कारवाईची मागणी पुढे आली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती कळताच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व माजी आमदार तथा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर यांनी तातडीने रूग्णालयात धाव घेऊन मुलींची विचारपूस केली, तसेच त्यांना धीर धरला. यावेळी या महिला नेत्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. वसतीगृह अधीक्षिकेवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली असता अतिशय धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतीगृहातील मुलींना अक्षरशः अळ्या पडलेले अन्न खाण्यास दिल्याचे दिसून आले. त्यातून अनेक मुलींना विषबाधा झाली. त्यातील पाच मुलींची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना रात्री दोन वाजेच्या सुमारास चिखलीतील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रसारमाध्यमांपासून आणि वरिष्ठ अधिकार्यांपासून ही माहिती लपविण्याचा धक्कादायक प्रकारदेखील घडला. खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या विद्यार्थिनींवर वैद्यकीय उपचार सुरू असून, गेल्या अनेक दिवसांपासून या मुलींना अशा प्रकारचे सडके अन्न दिले जात असल्याचे समजते आहे. परंतु, वसतीगृहातील मुली अत्यंत गरीब घरच्या व मागासवर्गीय समाजातील असल्याने त्या धमक्या व दबावापाेटी सर्व अन्याय सहन करत हाेत्या, असेही याप्रसंगी समजले. दरम्यान, या विषबाधेप्रकरणी चिखली पाेलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. या घटनेची उच्चस्तरीय चाैकशी करावी, अशी मागणी सर्वस्तरातून पुढे आली आहे. या सर्व मुली अत्यंत गरीब घरच्या असून, महाविद्यालयीन शिक्षणासाठी चिखलीत आलेल्या आहेत. या वसतीगृहासाठी राज्य सरकारचा समाज कल्याण विभाग लाखो रूपयांचा खर्च करते. तरीही मुलींना अळ्या पडलेले शिळे अन्न खायाला दिले जाते. त्यामुळे वसतीगृहाच्या अधीक्षिकेवर तातडीने गुन्हे दाखल करून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.
——-
सविस्तर बातमी लवकरच.. हे पेज रिफ्रेश करत रहा..