– जिल्ह्यात ९१ उपकेंद्रासाठी दोन हजार एकरावर होणार वीजनिर्मिती!
– इ-क्लास जमीन देणार्या ग्रामपंचायतींना मिळणार १५ लाखाचे अनुदान
बुलढाणा (बाळू वानखेडे) – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ९१ उपकेंद्रासाठी जिल्ह्यात २ हजार एकर जमिनीवर सौरऊर्जा निर्मिती होणार आहे. यासाठी ईक्लास जमीन देणार्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे. यामधून शेतकर्यांना दिवसा वीज देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकर्यांना सद्या महावितरणकड़ून आठ तास कृषी पंपासाठी वीजपुरवठा होत आहे. मात्र तो रात्री-बेरात्री करण्यात येत असल्याने कित्येक शेतकर्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. शिवाय, ट्रिपिंगही मोठ्या प्रमाणात होत असून, कमी दाबाची वीज मिळत असल्याने विद्युत मोटारी जळत असल्याने शेतकरी त्रस्त आहे. या समस्या कमी करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी योजना-२.० ला मंजुरी दिली असून, या योजनेतून जिल्ह्यात ९१ उपकेंद्रासाठी ४१४ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी दोन हजार एकर जमिनीची आवश्यकता असून, यासाठी पडिक व ई-क्लास जमीन देणार्या ग्रामपंचायतींना प्रत्येक वर्षी प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे तीन वर्षात १५ लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्यांना दिवसा अखंडीत व भरवशाची वीज देणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील व महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय पड़ळकर, अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्याकडून जागा उपलब्धतेसाठी संयुक्त मोहीम राबवली जात आहे. कार्यकारी अभियंता शशांक पोक्षे यांच्यामार्फत ७७७ एकर जमिनीचे निश्चितीकरणही करण्यात आले आहे.