Head linesNAGARPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

पाथर्डी-शेवगावात भाजपात दुफळी; पंकजा मुंडे- आ.राजळे समर्थकात पेटले शीतयुद्ध!

शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – भारतीय जनता पक्षाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी नुकतीच पक्षाची जिल्हा दक्षिणची जम्बो कार्यकारिणी घोषित केली. त्यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदासंघात सर्व गटतट बाजूला ठेवून सर्वसमन्वयक कार्यकारणी जाहीर झाली होती. मात्र, या घोषणेनंतर लागलीच पाथर्डी-शेवगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्या गटाविरुद्ध आ. मोनिका राजळे गट अशी मतदारसंघात भाजपअंतर्गत मोठी दुफळी जाहीरपणे समोर आली आहे. यात मुंडे समर्थक नूतन पदाधिकार्‍यांनी थेट पक्षश्रेष्ठीकडे सामूहिक राजीनामे देण्याची धमकी दिल्याने पक्षासमोरील आव्हान वाढले आहे. तसेच, गटबाजी आणखी पेटण्याचे संकेत मिळत आहेत.

भाजप जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी जाहीर केलेल्या पाथर्डी-शेवगाव पदाधिकार्‍यांमध्ये मुंडे गटाला मानणारे निष्ठावान कार्यकर्त्यांची वर्णी लागली. त्यामुळे आ. मोनिका राजळे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले व त्यांनी तातडीने पक्षाकडे दबाव वाढवल्याने आ. मोनिका राजळे यांनी नव्या निवडीला स्थगिती दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता निवड होऊन स्थगिती आलेले मुंडे समर्थक पदाधिकारी आक्रमक होऊन पक्षाचे प्रामाणिकपणे काम करुनही अन्याय होत असल्याने धास्तावले आहेत. याबाबत त्यांनी जाहीरपणे आ. राजळे यांच्या हस्तक्षेपाला उघड आव्हान दिले आहे. आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागलेले आहे.

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मोनिका राजळे यांचे नेतृत्व भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे-पालवे यांच्यामुळेच पुढे येऊ शकले. पंकजा मुंडे यांच्यामुळेच राजळे या आमदार होऊ शकल्यात. पहिल्यांदा आमदारकीवेळी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक होते, तसेच राजळेंना मोठा विरोध होता. त्यावेळे पंकजा मुंडे यांनी स्वकीयांचा विरोध डावलून मोनिका राजळे यांना लहान बहीण समजून उमेदवारी दिली होती. त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय झाला होता. नाराज गटाची ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी मनधरणी करुन आ. राजळे यांना मोठी मदत केली. परंतु, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष, संघटना, स्थानिक निवडणुकीत सातत्याने बाजूला सारण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.
बाळासाहेब सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

पाथर्डी पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, माजी अध्यक्ष तुषार वैद्य, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब कोळगे, गणेश कराड, मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड आदींनी जिल्हाध्यक्ष भालसिंग यांची भेट घेतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दाद मागितली आहे. निवडलेले पदाधिकारी हे २५-३० वर्षे पक्षासाठी काम केलेले मूळ भाजपचे कार्यकर्ते आहेत. पक्षाच्या वाईट काळात त्यांनी पक्ष मतदारसंघात टिकवून ठेवला आहे. त्यामुळे आता निवडलेले पदाधिकारी बदल केल्यास त्याचे दुष्पपरिणाम भविष्यात निवडणुकांत उमटू शकतात, असा इशारा निष्टवंतानी दिला असल्याने आ. मोनिका राजळे यांच्यासमोर दोन्ही गटांची नाराजी दूर करणे भविष्यात मोठे आव्हान दिसत आहे.


भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे-पालवे व त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील कौटुंबीक वाद मिटल्यात जमा असून, आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या परळीची जागा धनजंय मुंडे यांच्यासाठी सोडू शकतात. त्यामुळे पंकजा यांना सुरक्षीत मतदारसंघ म्हणून पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. विद्यमान आमदार मोनिका राजळे या पंकजा मुंडे यांच्यामुळेच या मतदारसंघात आमदार बनू शकल्या आहेत. परंतु, आता या व नजीकच्या नेवासा मतदारसंघात झालेल्या नव्या सोयरीकीमुळे मोनिका राजळे यांच्या पाठीशी सोयरेधायर्‍यांची राजकीय ताकद वाढली आहे. त्यामुळे तीन साखर कारखाने व दिग्गज राजकीय सोयरे यांच्यामुळे त्या पुन्हा एकदा विधानसभा गाठू शकतात, असा त्यांच्या समर्थकांचा कयास आहे. त्यामुळे राजळे समर्थक आतापासून पंकजा मुंडे यांच्या या मतदारसंघातील हस्तक्षेपाला विरोध करत असल्याची माहिती खासगीत बोलताना काही समर्थकांकडून कानावर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!