भरधाव स्वीफ्टचा टायर फुटला, भीषण अपघातात एकजण ठार
– दोघा गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगरला हलविले
बिबी (ऋषी दंदाले) – भरधाव स्वीफ्ट डिझायर कारचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार झाला असून, इतर गंभीर जखमी दोघांना छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील खळेगाव चॅनल नंबर ३०३वर हा भीषण अपघात झाला. भरधाव कार ही छत्रपती संभाजीनगरहून मेहकरकडे येत होती. आज (दि.२२) दुपारी तीन वाजता हा दुर्देवी अपघात घडला. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सविस्तर असे, की छत्रपती संभाजीनगर येथून स्वीफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच ०४ जीडी २०१५) ही भरधाव मेहकरला मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी येत होती. या कारचे बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत खळेगाव चॅनल क्रमांक ३०३ या ठिकाणी अचानक टायर फुटले. त्यामुळे कारने दोन-तीन पलट्या मारल्या. यामध्ये चालक अफरोज खान इब्राहिम खान (वय ३४) हा गंभीर जखमी झाला, त्याचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोन प्रवासी इब्राहीम खान व शेख रसूल शेख अब्दुल हे गंभीर जखमी झालेले आहेत. या जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. दोघा गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अपघातस्थळी जखमींच्या मदतीसाठी बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे व पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश सरदार यांनी तातडीने धाव घेतली होती. त्यांना स्थानिक ग्रामस्थांनीही सहकार्य केले.
आठ महिन्यांमध्ये ७०० हून अधिक अपघात, १०१ बळी
समृद्धी महामार्गावर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठे ७२९ अपघात झाले असून त्यापैकी ४७ अपघात जीवघेणे ठरले आहेत. या ४७ अपघातात १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर ९९ अपघातात २६२ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
————–