Breaking newsBULDHANAChikhaliHead linesVidharbha

शेतमालाचे पैसे बुडवून पळून गेलेला व्यापारी अंढेरा पोलिसांना अद्याप सापडेना; नाकर्तेपणा चव्हाट्यावर!

– पोलिस अधीक्षकांनी अंढेरा पोलिसांच्या नाकर्तेपणाकडे तातडीने लक्ष देण्याची शेतकर्‍यांची मागणी

चिखली (कैलास आंधळे) – शेतमाल खरेदीत अंत्री खेडेकर, मेरा बुद्रूक, असोलासह इतर गावांतील शेतकर्‍यांची लाखो रूपयांनी फसवणूक करून पळून गेलेला व्यापारी वहिद दिलावर खान (रा.असोला बुद्रूक, ता. चिखली) हा अद्याप अंढेरा पोलिसांना सापडलेला नाही. या प्रकरणाचा तपासदेखील थंडबस्त्यात पडला असून, पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळे व आरोपीला पाठीशी घालण्याच्या संशयास्पद भूमिकेमुळे फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी बुलढाण्यात एकदिवशीय साखळी उपोषण केले. परंतु, एलसीबी व अंढेरा पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी तोंडी आश्वासन देऊन बोळवण केली व हे आंदोलन मागे घेण्यास लावले. अंढेरा पोलिस या आरोपीला कधी जेरबंद करणार आहे? शेतमालाची रक्कम मिळणार आहे की नाही? असे संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. असाच प्रकार चिखली पोलिस ठाणेहद्दीतदेखील घडला असता तेथील आरोपी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तातडीने जेरबंद केला होता. अंढेरा पोलिसांना तसे अद्याप का जमत नाही, कुठं पाणी जिरतयं? असा संशय आता निर्माण होत आहे.

चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या असोला बुद्रूक येथील व्यापारी वहिद खान दिलावर खान याच्यावर शेतकर्‍यांना फसवणुकीचे गुन्हे दाखल होऊनसुद्धा पोलीस त्याला अटक करत नसल्याने अंत्री खेडेकर, असोला बुद्रूक, वसंत नगर, मोहाडी येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसून शासनाचे लक्ष वेधले होते. अंत्री खेडेकर येथील ज्ञानेश्वर यादवराव खेडेकर, समाधान पेंढारकर, श्रीकृष्ण डिगांबर खेडेकर व इतर शेतकरी यांनी २१ सप्टेंबररोजी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे एक दिवशीय साकळी उपोषण केले. परंतु, पोलिस प्रशासनाने केवळ तोंडी आश्वासन देऊन या शेतकर्‍यांची बोळवण केली. पसार झालेल्या व्यापार्‍याकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना अनेक वेळेस निवेदने देऊनसुद्धा शेतकर्‍यांचा शेतमाल घेऊन पैसे न देणार्‍या व शेतकर्‍यांची फसवणूक करणारा व्यापारी आजपर्यंत पसारच असल्यामुळे, या व्यापार्‍यास तात्काळ जेरबंद करून शेतकर्‍यांना न्याय मिळावा, यासाठी हे साखळी उपोषण करण्यात आले होते.
फसवणूक करून पळून गेलेला वहिद खान दिलावर खान याने अंत्री खेडेकर गावातील शेतकर्‍याकडून शेतमाल घेऊन पैसे दिले नाही, फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून या व्यापार्‍याविरुद्ध अंढेरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊनसुद्धा आरोपी आजपर्यंत अंढेरा पोलिसांना सापडत नसल्याने अंढेरा पोलिसांचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे शेतकरी सुलतानी आणि अस्मानी संकटाशी लढत असतानाच अशा फसवणुकीमुळे शेतकरी आत्महत्येसारखे मार्ग निवडताना दिसत आहेत. जर शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे मिळत नसेल तर शेतकर्‍यांनी न्याय कोणाकडे मागावा? व्यापार्‍याकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी तक्रार व निवेदनावर कोणतीही कारवाईने न झाल्याने दिनांक २१ सप्टेंबररोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसून शासनाचे लक्ष वेधले. दुपारनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी तसेच अंढेरा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार हरिहर गोरे तसेच वरिष्ठ पत्रकार प्रताप मोरे यांच्या उपस्थितीत तोंडी आश्वासनाने एक दिवसीय साखळी उपोषण शेतकर्‍यांनी गुंडाळले. उपोषणाला बसणार्‍या शेतकर्‍यांमध्ये समाधान पेंढारकर, ज्ञानेश्वर खेडेकर, दामोधर पडघान, श्रीकृष्ण खेडेकर, गजानन चंद्रशेखर, दिलीप पुंडलिक खेडेकर यांच्यासह इतर शेतकरी यांचा समावेश होता.


शेतमालाचे पैसे बुडवून पळून गेलेल्या व्यापार्‍याला अंढेरा पोलिस पाठीशी घालत आहे, की तो या पोलिसांना सापडत नाही? असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. अंढेरा येथे आलेले नवीन ठाणेदार आपल्या कामाची अद्याप चुणूक दाखवू शकले नाहीत. आजही या परिसरातील गावांतील लोकांना माजी ठाणेदार गणेश हिवरकर यांची आठवण येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी अंढेरा पोलिसांच्या नाकर्तेपणाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असून, येथील अधिकार्‍यांना पोलिसिंगवर भर देण्यास सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!