– देऊळगाव साकरशा इड़ब्ल्यूएस तर जानेफळ अनुसूचित जमातीसाठी राखीव
बुलढाणा (बाळू वानखेडे) जिल्ह्यातील रिक्त कोतवाल पदासाठीचे आरक्षण २१ सप्टेंबररोजी १३ही तालुक्यांतील संबंधित तहसील कार्यालयात काढण्यात आले. मेहकर तालुक्यातील २० रिक्त पदासाठीच्या काढलेल्या आरक्षण सोड़तीत देऊळगाव साकरशा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (इड़ब्ल्यूएस) तर जानेफळ अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाले आहे.
जिल्ह्यात ५३५ तलाठी साजे असून, यामध्ये अनेक दिवसांपासून कोतवालांच्या बर्याच जागा रिक्त आहेत. त्यामुळे तलाठयांना काम करताना अड़चणीचे जात आहे. कारण कोतवाल त्याच गावाचा रहिवासी असल्याने तलाठ्याला कामकाजात कोतवालाची मोठी मदत होते. एकूण रिक्त जागापैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील यांनी कोतवाल भरतीबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २१ सप्टेंबररोजी जिल्ह्यातील तेराही तालुक्याचे ठिकाणी संबंधित तहसीलदारांनी तालुक्यातील रिक्त पदासाठीची आरक्षण सोड़त काढली. यामध्ये मेहकर तालुक्यातील २० रिक्त पदासाठीची आरक्षण सोड़त मेहकर येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी मेहकर भाग एक, अंत्री देशमुख, मोहखेड़, अनुसूचित जातीसाठी सारंगपूर व सारशिव, खुल्या प्रवर्गासाठी भालेगांव, शेंदला,सोनाटी, बोरी, वड़गाव माळी व शेलगाव काकड़े, इड़ब्ल्यूएससाठी देऊळगाव साकरशा, इड़ब्ल्यूएस महीलेसाठी देऊळगाव माळी, नायगाव दत्तापूर-भजब, ड़ोणगाव भाग एक इतर मागासवर्गीय महिला व उकळी इमाव, मादणी भजक, जानेफळ भाग एक अ.जमाती व ब्रम्हपुरी अ.जमाती महिला ,हिवरा खुर्द अ.जाती महिला असे आरक्षण निघाले आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा कोतवाल पदभरती समिती अध्यक्ष दिनेश गिते, तहसीलदार तथा कोतवाल पदभरती सदस्य सचिव नीलेश मड़के, रमेश ढगे मुख्याधिकारी तथा कोतवाल पदभरती समिती मागासवर्गीय सदस्य, संबंधित साजाचे तलाठा, संबंधित गावचे सरपंच, विविध पक्षाचे पदाधिकारी, नागरिक व तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.