Head linesNAGARPachhim Maharashtra

भगवान गडावरील संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरासाठी देणग्यांचा ओघ वाढला; ठाकूरपिंपळगांवकरांची ७० लाखांची देणगी जाहीर!

शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – श्री क्षेत्र भगवानगड येथील नियोजित भगवान ज्ञानोबारायांच्या भव्यदिव्य मंदिराच्या बांधकाम व विविध विकासात्मक कामासाठी ठाकूर पिंपळगाव ता. शेवगाव येथील ग्रामस्थांनी ७० लाख रुपये देणगी देण्याचे सर्वानुमते जाहीर केले आहे. उर्वरित बाहेरगावी उदरनिर्वाहासाठी गेलेले कुटुंबही भरीव देणगी देणार असल्याने अजून काही भर पडणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ज्ञानोबांच्या मंदिरासाठी नुसता पाया खोदला तरी देणगीचा ओघ वाढला असल्याने हा एक चमत्कारच मानला जात आहे.

ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांचा श्वास म्हणजे साधकांचे मायबाप समजले जात असलेले विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज. त्यांचे विलोभनीय काळापाषण दगडी भव्यदिव्य मंदिर उभारणीचे काम महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी हाती घेतले आहे आणि मंदीर उभारणीसाठी देणगी देण्याचे भाविकांना आवाहन केले आहे. वारकरी सांप्रदायाचा आत्मा असलेले संत ज्ञानेश्वराचे भव्यदिव्य मंदिर भगवान गडावर लवकरच साकारत आहे, आणि ते डॉ. शास्त्रीजींच्या हस्ते होत असल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून ग्रामीण भागातून देणगीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सदर मंदिरासाठी देणगी देण्यासाठी भविकात मोठी चढाओढ लागल्याचे दिसत आहे, अगदी छोटेसे गांव देखील सर्वस्व पणाला लावत देणगीचा भरीव आकडा समर्पित करत असल्याचे आजवरच्या अनेक आकडेवारीवरून दिसत आहे. अहमदनगर जिल्हाच नव्हे तर बीड, जालना, अकोला आदीसह महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातून देणगी दिली जात आहे. शेवगाव तालुक्यातील १००-१५० उंबरे (घरे) तसेच सुमारें दीड हजार आसपास लोकसंख्या असलेल्या ठाकूरपिंपळगावच्या गावकर्‍यांनी सुमारें ७० लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. उर्वरीत बाहेरगावी उपजीविकेसाठी स्थलांतरित कुटुंबाकडून अजून काही लाखांची भर पडणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महंत डॉ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे उपस्थितीत ठाकूर पिंपळगांवकरानी आपले देणगीचे योगदान समर्पित केले. या वेळी भगवान बाबा की जय असा जयघोष भाविकातून होत होता. काळे दगड कटींगचे काम सुरू आहे, शिवाय आता पाया खोदकाम व भराव करण्याचे काम सुरू झाले असल्याने देणगीचा ओघ जोराचा सुरू असल्याचे गडाचे महंत डॉ.शास्त्री यांनी सांगितले.


संत भगवानबाबा व संत वामनभाऊ तसेच विठ्ठल-रूख्मिणी मंदीर, तसेच शंकर भगवान् पिंड व मूर्तीप्राणप्रतिष्ठा कलशरोहण कार्यक्रम महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्याहस्ते करण्यात आला असून, डॉ. शास्त्रींचे आगमन होताच ग्रामस्थांनी टाळ-मृदुंगाच्या व फटाक्याची आतषबाजी तसेच जेसीबीमधून फुलाची उधळण करीत भव्यदिव्य स्वागत केले. महिलांनी डोईवर कलश घेवून भगवान बाबा की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तर भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. तर आचार्य अशोक महाराज शास्त्री यांच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. भगवानगडाला युवकांनी साथ द्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, गडावर संपर्क ठेवून प्रेम, स्नेहबंध, आपुलकी वाढवावी, असे आहवान यावेळी महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी केले. भगवानगडावर लवकरच धार्मिक शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला असून, लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याचेही डॉ.शास्त्री यांनी सांगितले.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!