नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादीकडून ओबीसींसाठी २७ टक्के जागा राखीव!
– ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादीचा लढा चालूच राहील
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि आता होऊ घातलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी २७ जागा आम्ही राखीव ठेवणार आहोत. पक्ष या जागांवर ओबीसींनाच उमेदवारी देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सनदशीर मार्गाने प्रयत्न करतच राहणार असल्याचे पाटील म्हणाले.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेही यापूर्वी पक्षाच्या एकूण जागांपैकी २७ टक्के जागा ओबीसींना देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही २७ टक्के जागा ओबीसींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की ओबीसी आरक्षणाशिवाय येणार्या निवडणुका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. राज्यातील 92 नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकीत २७ टक्के जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीच उमेदवार देणार आहे. परळी नगर परिषद निवडणुकीत तशा प्रकारची घोषणा पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच केलेली आहे.
———–