खासदार प्रतापराव जाधव हे उद्धव ठाकरेंसोबत, तर खासदार भावना गवळी साथ सोडणार?
– खासदार जाधव यांच्यासह १२ निष्ठावंत खासदारांची ‘मातोश्री’वरील बैठकीला हजेरी
खासदारांच्या बैठकीत संजय राऊत एकटे पडले, न बोलता निघून गेले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध इतर सर्व खासदार अशी चर्चा झाली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘यूपीए’चे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करण्याची आग्रही भूमिका मांडली. तर शिवसेनेचा इतर सर्व खासदारांचा ‘एनडीए’च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना मतदान करावे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली. यावर उद्धव ठाकरे यांनी पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर करू, असे आश्वासन सर्व खासदारांना दिले. पण, यावेळी ‘मातोश्री’वरच्या बैठकीत संजय राऊत विरुद्ध इतर सर्व खासदार अशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एवढेच नाहीतर संजय राऊत ‘मातोश्री’बाहेर पडल्यावर काही ही न बोलता निघून गेले.
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह १२ निष्ठावंत खासदारांनी हजेरी लावली आहे. तर वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यासह सात खासदारांनी दांडी मारली आहे. हे सात खासदार शिंदे गटासोबत जाणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. प्रतापराव जाधव यांचे दोन राजकीय शिष्य आमदार डॉ. संजय रायमुलकर व आ. संजय गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याने खासदार जाधव यांच्याबाबत साशंकता होती. त्यातच काल त्यांनी पंढपुरात विठ्ठल-रुख्मिणी मातेचे दर्शन घेतले. नेमके त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदेही पंढरपुरात होते. परंतु, खासदार जाधव यांनी शिंदे यांची भेट टाळून उद्धव ठाकरे यांचीच साथ देण्याचा निश्चय पक्का केला असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेचे १९ पैकी १६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा राज्यात रंगत होत्या. तसेच, काही खासदारांची गोपनीय बैठक झाल्याचीही चर्चा होती. त्या अनुषंगाने व राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीला वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी, परभणीचे खासदार संजय जाधव, कोल्हापूरचे संजय मंडलिक, हिंगोलीचे हेमंत पाटील, कल्याण-डोंबिवलीचे डॉ. श्रीकांत शिंदे, रामटेकचे कृपाल तुमाने यांच्यासह दादरा-नगर हवेलीचे खासदार कलाबेन डेलकर हे गैरहजर होते.
तर ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रती आपली निष्ठा राखत, आपण शिवसेनेसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे मुंबई (ईशान्य)चे खासदार गजानन किर्तीकर, दक्षिण-मुंबईचे अरविंद सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विनायक राऊत, हातकणंगलेचे ध्यैर्यशील माने, नाशिकचे हेमंत गोडसे, दक्षिण-मध्य मुंबईचे राहुल शेवाळे, पिंपरी-चिंचवड-मावळचे श्रीरंग बारणे, बुलडाणाचे प्रतापराव जाधव, शिर्डीचे सदाशिव लोखंडे, उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर, पालघरचे राजेंद्र गावीत, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यासह राज्यसभेचे खासदार संजय राऊत व प्रियंका चतुर्वेदी हे हजर होते. तर राज्यसभेचे खासदार अनिल देसाई हे दिल्लीत आहेत. एकूणच १९ पैकी १२ खासदार बैठकीला हजर राहिले तर सात खासदारांनी दांडी मारल्याने हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील दोन आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकावत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. हे बंडखोर शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना, आता सात खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याचे दिसून येत असल्याने ठाकरे यांच्यासमोरील राजकीय अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.
अनुपस्थित खासदारांमध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचाही समावेश आहे. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने आपण दिल्लीमधील बैठकीला उपस्थित राहिल्याने मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतापराव जाधव यांच्यावर विदर्भाची जबाबदारी?
शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर विदर्भाची जबाबदारी सोपविले जाण्याची शक्यता शिवसेनेतील वरिष्ठस्तरीय सूत्र व्यक्त करत आहेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील दोन आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा माजी आमदार विजयराज शिंदे यांना शिवसेनेत घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्याची जबाबदारीही खासदार जाधव यांच्यावर सोपविली गेल्याचे सूत्र म्हणाले. तसेच, मेहकर विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित असल्याने तेथे शिवसेनेकडून नवीन नेतृत्व पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, विदर्भात शिवसेनेची बांधणी करण्याची जबाबदारीही खासदार जाधव यांच्यावर सोपवली जाणार असल्याचे या सूत्राचे म्हणणे आहे.
—————-शिवसेनेचे १२ खासदार आमच्या संपर्कात – रावसाहेब दानवे
जालना : शिवसेनेचे १२ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. हे बारा खासदार शिंदे गटाच्या मूळ शिवसेनेत येणार असल्याचा दावादेखील रावसाहेब दानवे यांनी केला. ते जालन्यात बोलत होते. दानवे म्हणाले की, मुलायम सिंग यांच्या पक्षाप्रमाणेच शिवसेनेकडे निवडणूक चिन्हदेखील राहणार नाही. न्यायालयाने आधी काही दिलेल्या निर्णयाचा दाखला दिल्यास खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे हे सिद्ध होईल, असेही दानवे म्हणाले.